परभणी : संविधानाने आपणास विज्ञाननिष्ठ बनण्याची हाक दिली असून, विज्ञानाचा अंगीकार करीत आयोजित केलेली कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांना खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.
येथील रविराज पार्क भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने ९ एप्रिल रोजी ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल शाळेत प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी टाकसाळे बोलत होते. यावेळी माजी सभापती रवी सोनकांबळे, डॉ.प्रकाश डाके, डॉ.बी.टी. धुतमल, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, सहाय्यक निबंधक अभय कटके, गौतम मुंडे, प्राचार्य प्रिया ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी टाकसाळे म्हणाले, संविधान, विज्ञान आणि लसीकरणाच्या रसायनातून आपण कोरोनाचा यशस्वी मुकाबला करू शकतो. यंदाच्या जयंती महोत्सवात लसीकरणावर भर देत डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पंकज खेडकर यांनी प्रास्ताविक केले. भीमप्रकाश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पंकज खेडकर, सुंदर भालेराव, दिलीप माने, दिलीप मालसमिंदर, आर.एन. मस्के, राजू रणवीर, संदीप रणवीर, मिलिंद ढाले, संकेत गाडेकर, सुजित धावरे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. रविराज पार्क जयंती उत्सव समिती आणि ज्योतिर्गमय शाळेच्या प्राचार्य प्रिया ठाकूर यांच्या पुढाकारातून बोलक्या रांगोळ्या व प्रबोधनात्मक भित्तीपत्रके लावून शिबीर स्थळ सजविण्यात आले होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी जितू कलप्पा यांच्यासह ज्योतिर्गमय शाळेचे कर्मचारी व मनपा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
१३० जणांचे लसीकरण
रविराज पार्क येथे आयोजित केलेल्या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली १३० जणांना लसीकरण करण्यात आले. रविराज पार्क व परिसरातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.