परभणी : गंगाखेड येथील दूध संकलन केंद्रामध्ये अधिकारी जाणीवपूर्वक फॅट कमी दाखवत असल्याची तक्रार सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील स्वप्नपूर्ती दूध उत्पादक व पुरवठा संस्थेने केली आहे.
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून दुधाचे संकलन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच शासकीय दूध संकलन केंद्रातील अधिकारी-कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याच्या तक्रारीही आता पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे दुर्लक्षित असलेली ही शासकीय यंत्रणा आणखीच खिळखिळी होण्याची भीती निर्माण झाली आहे. सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील स्वप्नपूर्ती दुग्ध उत्पादक व पुरवठा संस्थेचे सचिव मनोज पुरी यांनी यासंदर्भात गंगाखेड येथील दूध संकलन केंद्राच्या पर्यवेक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. दुधाची फॅट काढण्यासाठी वापरले जाणारे अल्कोहोल निकृष्ट दर्जाचे असते. किंवा या अल्कोहोलमध्ये पाणी मिसळून जाणीवपूर्वक फॅट कमी लावली जात आहे. त्याचप्रमाणे दूध संस्था चालकांना पैसे मागणे, प्रत्यक्ष दूध संकलन व रेकॉर्डवरील दूध संकलनात तफावत करणे, वजन मापात फेरबदल करून दुधाच्या वजनात बदल करणे, अरेरावीची भाषा वापरणे आदी तक्रारी या संस्थेने केल्या आहेत. शिवाय दूध संकलन केंद्रातील कर्मचारी घरी दूध देण्यासाठी वारंवार त्रास देत असल्याचीही तक्रार या संस्थेने केली आहे. तेव्हा या प्रकाराची चौकशी करून कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी स्वप्नपूर्ती संस्थेचे सचिव मनोज पुरी यांनी केली आहे.