परभणी : कोरोनापासून मुक्तता मिळविण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा घटक असला तरी त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याची बाब दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साधारणत: अडीच लाख नागरिकांना लस मिळाली असून, सध्या तुटवडा आहे. याच गतीने लसीकरण झाले तर डिसेंबर महिन्यापर्यंतही १०० टक्के लसीकरण होणे कठीण आहे.
कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी शासनाने लसीकरणाला सुरुवात केली खरी. परंतु, लसीचा पुरेसा साठा जिल्ह्याला मिळत नसल्याने ही यंत्रणा अडखळत चालविली जात आहे. सद्य:स्थितीला कोव्हॅक्सिनची लस अजूनही जिल्ह्यात उपलब्ध नाही, तर कोविशिल्ड लसीचा तुटवडा असल्याने १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण बंद केले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात २०४ केंद्रांवरून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. आता ग्रामीण भागातील केंद्र महिनाभरापासून बंद आहेत. शहरातील केवळ ८ ते १० केंद्रांवरच लसीकरण होत आहे.
जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस अद्याप उपलब्ध झाली नाही. साधारणत: १४ लाख नागरिकांना लस द्यावयाची असून, पाच महिन्यांमध्ये केवळ अडीच लाख नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. त्यातही अनेक नागरिकांना दुसरा डोस मिळालेला नाही. याच गतीने लसीकरण सुरू राहिले तर यावर्षीच्या डिसेंबरपर्यंतही १०० टक्के लसीकरण होणे अशक्य आहे.
आधी २०४ केंद्र होती, आता केवळ ५५
जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू २०४ केंद्र सुरू करण्यात आली. परंतु, या सर्व केंद्रांवर मोजक्याच दिवशी लसीकरण झाले. सध्या तर लस उपलब्ध नसल्याने शहरी आणि ग्रामीण भागात मिळून दररोज सरासरी ५५ केंद्रांवरूनच लसीकरण केले जात आहे. त्यातही अत्यल्प प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जात आहे.
युवकांचे लसीकरण महिनाभरापासून बंदच
शासनाने १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरणाला १ मेपासून प्रारंभ केला. मात्र साधारणत: आठ दिवस हे लसीकरण चालले. लसीकरण करतानाही युवकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या.
ऑनलाइन लॉगिन होत नसल्याने इच्छा असूनही अनेकांना लसीकरण करता आले नाही. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने केलेली ही उपाययोजना असफल ठरली. त्यामुळे लसीकरणाला वेग मिळाला नाही.
काही दिवसानंतर या वयोगटासाठी मुबलक लस उपलब्ध होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सध्या तरी बंद ठेवले आहे.