गतवर्षीच्या खरीप हंगामात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली होती. जून महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची पिके चांगली बहरली. परंतु, जिल्ह्यातील १२ हजार ५०० शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. तालुका कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने १२ हजार ५०० हेक्टरवरील पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले. कृषी विभागाने पंचनामे केल्याचा अहवाल बियाणे कंपन्यांना सुपूर्त केला. परंतु, दुसऱ्या हंगामाची पेरणी काही आठवड्यांवर येऊन ठेपली असतानाही सोयाबीन बियाणे कंपन्यांनी दुबार पेरणी कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना दमडीचीही मदत केली नाही. तर, दुसरीकडे सद्यस्थितीत परभणीच्या बाजारपेठेत ईगल, महाबीज, ग्रीन गोल्ड, अंकुर आदी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे विक्रीसाठी बाजारात आले आहे. एकीकडे उगवण न झालेल्या बियाणांची मदत करण्याऐवजी त्याकडे कानाडोळा करत सर्रासपणे आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी सोयाबीन बियाणे विक्रीसाठी आले आहे. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून विक्रीसाठी खासगी कंपन्यांनी बियाणे बाजारात आणल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
ईगल कंपनीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ईगल सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीविरुद्ध ४ हजार २८५ तक्रारी केल्या आहेत. परंतु, या कंपनीने आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला मदत केली नाही. शेतकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ १ हजार ३५० महाबीज, ८१५ ग्रीन गोल्ड, सारस, गोदा फार्म आदी कंपन्यांनी बियाणे सदोष असल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी कार्यालयात केल्या. प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठविला आहे. मात्र, मदतीसाठी अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत, असे असतानाही बाजारात मात्र हे बियाणे विक्रीसाठी आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.
ईगल- ४२८५
ग्रीन गोल्ड- ८१५
महाबीज- १३५०