सोनपेठ: सीसीआयच्या वतीने एक दिवसाची कापूस खरेदी सुरु झाली आहे; परंतु, आठवडाभर कापूस खरेदी सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सोनपेठ तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.बाबाजानी दुर्राणी यांनी ११ डिसेंबर रोजी तालुक्यातील थडी उक्कडगाव येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखाना उद्घाटनप्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, दशरथ सूर्यवंशी, लक्ष्मीकांत देशमुख, मधुकर निरपणे, विठ्ठलराव सूर्यवंशी, दिनकर तिथे, मदन विटेकर, भगवान राठोड, समीर वाळके, पंकज आंबेगावकर, दत्तराव मायंदळे, राम बेंद्रे, अशोक यादव यांची उपस्थिती होती. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने उसाला चांगला भाव देत आहेत. त्यामुळे सहकाराची चळवळ पश्चिम महाराष्ट्रात पुढे गेली आहे. मात्र आपल्या जिल्ह्यात सहकारक्षेत्र स्वाहा झाले आहे. जिल्ह्यातील काही नेते जेलमधून निवडून आले आहेत, ही बाब जिल्ह्यासाठी चिंतेची आहे. आपण आरोपप्रत्यारोप असणाऱ्या नेत्यांना निवडून देतो; परंतु, कामाच्या विकासाचे मूल्यमापन करणार नाहीत तोपर्यंत आपला विकास होणार नाही, असे आ. दुर्राणी म्हणाले. या कार्यक्रमात थडी उक्कडगाव येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखाना व गोदावरी ग्राेवर्स प्रोड्युसर या कंपनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. गोकुळदास कलिंदर, गोविंद धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत बिरादार यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी श्रीराम भंडारे, सिद्धेश्वर जाधव, सूर्यकांत कदम, गोविंद जाधव, पांडुरंग गव्हाणे, मनोहर चांदवडे, अवधूत भंडारे, प्रभाकर डुकरे, भगवान चांदवडे, प्रल्हाद भंडारे, सचिन रणखांबे, राजेभाऊ चांदवडे आदींनी प्रयत्न केले.