कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने देशभरात सध्या लसीकरण मोहीम जोरात सुरु असली तरी मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण होत आहे. लसीचे महत्व आता नागरिकांना पटल्याने लस घेण्यासाठी संबंधित केद्रांवर गर्दी होत आहे. यात काही जण कोविशिल्ड लसीचा पहिला, तर काही जण कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या कॉकटेल लसीकरणामुळे संबंधित व्यक्तीवर विपरित परिणाम होत नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. असे असले तरी कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लसीने अपेक्षित असलेला परिणाम साधता येणार नाही, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लसी घेतल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज म्हणाव्या त्या प्रमाणात तयार होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
परभणी जिल्ह्यात अशी घटना अद्याप समोर आली नाही.
कोरोना लसीचा पहिला डोस वेगळा आणि दुसरा वेगळा घेतला, अशी एकही घटना परभणी जिल्ह्यात आढळून आली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून लसीकरण मोहीम अतिशय गांभीर्यपूर्वक राबविण्यात येत आहे. संबंधितांचे याबाबत प्रबोधन करण्यात येते, असे सांगण्यात आले.
‘कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ज्या कंपनीचा घेतला आहे, त्याच कंपनीचा ठरवून दिलेल्या वेळेत दुसरा डोस घ्यावा, अशी मार्गदर्शक तत्व अभ्यासाअंती निश्चित केली आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. जर चुकूनच वेगळ्या कंपनीचा दुसरा डोस घेतला, तर दुसऱ्या डोसनंतर संबंधितांच्या शरीरात म्हणाव्या त्या प्रमाणात अँटिबॉडीज तयार होत नाहीत. त्यामुळे शासन निर्देशाचे पालन करणेच योग्य आहे.
- डॉ. प्रकाश डाके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
लसीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन डोस घेतल्यास संबंधितांच्या जीवितास धोका नाही. मात्र, लस घेतल्यानंतर कोरोनापासून संरक्षण मिळण्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही.
- डॉ. रावजी सोनवणे