पूर्णा नदीकाठी असलेल्या निळा या गावचे २०१७ मध्ये नवीन जागी पुनर्वसन झाले. पुनर्वसनासाठी ही अनेक वर्षे लागली. गावाची लोकसंख्या २ हजार १०० च्या जवळपास असून गावात १ ते ७ वीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेत २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ७ वर्गासाठी ४ वर्गखोल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करावे लागत आहे. मुख्याध्यापक कक्ष व कार्यालय व तीन वर्गांसाठी या शाळेला खोल्या उपलब्ध नाहीत. वाढीव खोल्या मिळाव्यात, यासाठी शालेय शिक्षण समिती व ग्रामस्थांचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेकडे वाढीव खोल्या बांधकामासाठी वेळोवेळी मागणी केली; परंतु केवळ आश्वासनाव्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी पर्याय म्हणून चार पत्राच्या खोल्या तयार केल्या. पाणी पाऊस व वादळाच्या परिस्थितीत अनेकदा या खोल्यांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्ञानदानासाठी सुरक्षित असे वर्ग मिळणे हे त्या विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क असताना निळा गावातील विद्यार्थ्यांना व पालकांना यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
७२६२ चौरस मीटर जागेवर केवळ ४ वर्गखोल्या
शालेय समितीने दिलेल्या माहितीवरून निळा पुनर्वसित गावात शाळेसाठी ७२६२ चौ.मी. जागा उपलब्ध आहे. या जागेपैकी केवळ ४ खोल्या बांधकाम केलेल्या आहेत. निळा या गावा सोबतच महागाव येथील विद्यार्थी ही या शाळेत शिक्षण घेत आहेत. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे वर्ष दीड वर्ष शाळा बंद होत्या; परंतु आता हळूहळू वर्ग सुरू होत असल्याने या वर्गखोल्याचे काम तातडीने सुरू होणे गरजे आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर सूर्यवंशी, नागोराव सूर्यवंशी, मारोती सुके, संभाजी सूर्यवंशी, ओंकार वसमतकर, शिवाजी सूर्यवंशी, लक्ष्मण सूर्यवंशी, विठ्ठल भाऊराव, ज्ञानोबा सूर्यवंशी, शिवाजी जमदाडे, सुभाष सुके यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
पत्राच्या खोल्यांना झाडा-झुडपांचा वेढा
ग्रामस्थांचे सहकार्य व लोकवर्गणीतून विद्यार्थ्यासाठी बांधलेल्या पत्राच्या खोल्यांना पावसाळ्यात झाडा-झुडपांचा वेढा पडतो. चारही बाजूने झुडपे असल्याने विद्यार्थ्यांना साप, विंचवाची भीती वाटते. वादळ वाऱ्यात ही पत्रे उडण्याची दाट शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.