परभणी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी मागणी वाढलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमती कमी झाल्याचे राज्यस्तरावरून स्पष्ट करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात मात्र जुन्या दरानेच रविवारी या इंजेक्शनची विक्री झाली.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात या इंजेक्शनचा सध्या तुटवडा असून, दररोज सुमारे ५०० इंजेक्शन जिल्ह्यासाठी लागतात. त्या तुलनेत पुरवठा मात्र कमी होत आहे. इंजेक्शनचा साठा कमी असल्याने त्याचा काळाबाजार होत असल्याने जिल्हा प्रशासनाने या इंजेक्शनची नोंदणी केल्यानंतरच ते उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
याच दरम्यान, रविवारी इंजेक्शनच्या किमती कमी झाल्याचे वृत्त राज्यस्तरावरून देण्यात आले. त्याचप्रमाणे हे दर जुन्या साठ्यांनाही लागू करण्याचे संकेत देण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यात जुन्या साठ्याचे इंजेक्शन जुन्या दरानुसारच विक्री झाले.
नवीन दरांबाबत अद्यापपर्यंत प्रशासकीय स्तरावरून निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे जुन्या दरानुसारच जिल्ह्यामध्ये रविवारी रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री झाल्याचे दिसून आले.
खरेदी दरानुसारच विक्रीचे निर्देश
जिल्ह्यात रेमडेसिविर या इंजेक्शनच्या कंपनीनुसार वेगवेगळ्या किमती आहेत. प्रशासनाने इंजेक्शन खरेदीच्या दरावर १० ते १५ टक्के अधिक किंमत घेऊन विक्रेत्यांनी इंजेक्शनची विक्री करावी, असे निर्देश दिले आहेत.
औषधी दुकानांवर साठाच नाही
परभणी शहरातील विविध औषधी दुकानांवर रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमतीची विचारणा केली तेव्हा साठा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच हे इंजेक्शन आता डॉक्टरांमार्फत मिळत असल्याचेही औषध विक्रेत्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडे नोंदणी केल्यानंतरच इंजेक्शन उपलब्ध होते.
१०० एमजी इंजेक्शनच्या किमती (नवे दर)
कॅडिला ८९९ रु.
सिल्जिन इंटरनॅशनल २४५० रु.
डॉ. रेड्डीज २७०० रु.
सिप्ला ३००० रु.
मायलॅन ३४०० रु.
ज्युबिलंट ३४०० रु.
हेटेरो ३४९० रु.