मोफत वाळू उपलब्ध करून द्या
पूर्णा : रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या अनेक घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. जिल्हा प्रशासनाने काही वाळू धक्यांचे लिलाव केले असले तरी घरकुल लाभार्थ्यांना मात्र माफक दरात वाळू मिळत नाही. त्यामुळे या घराचे काम अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे या घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी तालुका प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा
सोनपेठ : अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ज्वारी व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुका महसूल प्रशासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
ग्रामीण मार्गावरील बससेवा बंद
परभणी : जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या चार आगारांतून नऊ तालुक्यांतील प्रवाशांचे ने-आण करण्यात येते. मात्र, मागील वर्षभरापासून कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्यासाठी वारंवार संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बस सेवा कोलमडली आहे. परभणी-औरंगाबाद, परभणी-नांदेड या दोन प्रमुख मार्गासह ग्रामीण भागातील बससेवा मागील अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. ही बससेवा सुरू झाली तर एसटी महामंडळाच्या उत्पादनात मोठी भर पडणार आहे.