शहरातील विविध भागात पोलीस प्रशासनाने एकूण ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्या त्या भागातील चलचित्र थेट सीसीटीव्ही वॉलवर पाहण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा असो किंवा एखादी संवेदनशील घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सीसीटीव्ही वॉल येथून नियंत्रण मिळविता येणार आहे.
पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वॉलच्या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाशकुमार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आणखी १० वाहने पोलीस दलात दाखल
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाने २० अद्ययावत वाहनांची खरेदी केली आहे. त्यापैकी १० वाहने यापूर्वीच पोलीस दलात दाखल झाली होती. १ मे रोजी आणखी दहा वाहने प्राप्त झाली. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्राप्त झालेल्या वाहनांपैकी १९ वाहने जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कामाला गतिमानता येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.