काँग्रेसच्या वतीने सोमवारी महागाईच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी पिंपळगाव काजळे येथील सुनील नानासाहेब काजळे हे आले होते. दुपारी १२ च्या सुमारास ते मोर्चात मित्रांसह चालत असताना त्यांच्या खिशातून पाकीट काढून दोन जण पळून जात असताना दिसून आले. या वेळी त्यांनी एकास पकडले व अन्य एक जण मोर्चातील गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. पकडलेल्या तरुणाचे नाव राहुल रमेश शिंदे (१८ वर्षे, रामकृष्ण नगर, परभणी) असे आहे. या वेळी त्याला चोरलेले पाकीट कुठे आहे, असे विचारले असता त्याने त्याच्या सोबतच्या रवी शिंदे (रा. बलसा, परभणी) याने पाकीट घेऊन गेल्याचे सांगितले. काजळे यांच्या पाकीटमध्ये २२ हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे होती. या वेळी काजळे यांचे मित्र आश्रोबा कोरडे तेथे आले. त्यांनीही त्यांचे साडेसात हजार रुपयांचे पाकीट चोरीस गेल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून, चोरट्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी सुनील काजळे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी राहुल रमेश शिंदे व रवी शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोर्चात पाकीटमारी करणाऱ्यास पकडले; एक जण पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST