वसमत रस्त्यावरील निवाऱ्यांची दुरवस्था
परभणी : शहरातील वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. या निवाऱ्यांच्या ठिकाणी थांबण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर थांबूनच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
सिंचनाच्या सुविधेमुळे उत्पन्नात होणार वाढ
परभणी : जायकवाडी प्रकल्पातून कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी जमिनीची पाणीपातळीही चांगली आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
औषधीसाठी बाहेरचा रस्ता
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काही औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याने उपचार तर केले जातात. परंतु, औषधीसाठी मात्र बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. परिणामी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या हेळसांडीमध्ये आणखीच भर पडली आहे. सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय उदासीनता महागात पडत आहे.
नियंत्रण नसल्याने निकृष्ट काम
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने बांधलेल्या दोन्ही इमारतींचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. दीड-दोन वर्षांत या इमारतीची दुरवस्था झाल्याने कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम अंतर्गत हे काम झाले आहे. मात्र, एका वर्षात फरशा उखडणे, स्लॅब उखडण्याच्या घटना घडल्या आहेत.
डांबरीकरण करण्याची मागणी
खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी फाटा ते राणीसावरगाव या ९ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहने चालवितांना वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा रस्ता परभणी आणि लातूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.