माळसोन्ना येथील शेतकरी अनंता सोपानराव लाड हे २४ जून रोजी रात्री त्यांच्या आखाड्यावर पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. यावेळी एका व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने त्यांच्या आखाड्यावरील गोठ्यातील एक बैल सोडला. दुसरा बैल सोडत असताना त्या बैलाने चोरट्यास ढुसनी मारली. त्यामुळे हा चोरटा आपटला. याचा आवाज आल्याने अनंता लाड हे झोपेतून जागे झाले. त्यांनी उठून पाहिले असता एक इसम त्यांना दिसला. त्यांनी त्याला तू कोण आहेस? असे विचारले असता तो व्यक्ती पळून जाऊ लागला. त्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग करत आरडाओरडा केला असता शेजारचे शेतकरी धावत आले. त्यांनी त्या चोरास पकडले. यावेळी त्याने त्याचे नाव गजानन दादाराव सुरवसे (रा. पोहेटाकळी, ता. पाथरी, जि. परभणी), असे सांगितले. त्यानंतर या चोराला पोलीस पाटील मनोज शिवाजीराव चव्हाण यांच्या हवाली केले. चव्हाण यांनी याबाबत दैठणा पोलिसांना माहिती दिली व त्याला दैठणा येथे आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत अनंता लाड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून गजानन दादाराव सुरवसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बैल चोरणाऱ्यास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST