परभणी : एकेका समाज घटकाचे आरक्षण रद्द करून संपूर्ण भारत देश आरक्षणमुक्त करण्याचा डाव संघप्रणीत भाजप सरकारचा असून, त्यास आमचा विरोध आहे. काँग्रेस पक्ष याविरुद्ध तीव्र आंदोलन उभारणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भानुदास माळी यांनी येथे दिली.
जिल्हा काँग्रेसचा आढावा आणि संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. माळी हे ५ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेस माजी खा. तुकाराम रेंगे, भगवान कोळेकर, संतोष रसाळकर, प्रा. तुकाराम साठे आदींची उपस्थिती होती.
प्रा.भानुदास माळी म्हणाले, ओबीसीची परिस्थिती सध्या वाईट आहे. न्यायालयाने ओबीसीचा इम्पिरिकल डाटा मागविला आहे. हा डाटा केंद्र शासनाकडे उपलब्ध आहे. तत्कालीन मनमोहनसिंग सरकारनेच तो तयार केला आहे. मात्र, भाजप सरकार हा डाटा जाणीवपूर्वक देत नाही. न्यायालयात तो देण्याची वेळ आलीच तर चुकीचाही दिला जाऊ शकतो, अशी आमची शंका आहे. त्यामुळे ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस दिल्ली येथे तीव्र आंदोलन करेल. सरकारला जनगणना करण्यास भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र शासनाला समान नागरी कायदा करायचा आहे. त्यामुळेच चातुर्याने आमचे आरक्षण काढून घेण्याचे पाप संघप्रणीत भाजप सरकार करीत आहे, ते आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा माळी यांनी दिला. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीत ओबीसीला २७ टक्के आरक्षण द्यावे, ओबीसीच्या योजनांसाठी भरीव आर्थिक तरतुदी कराव्यात, ओबीसी महामंडळासाठी ५ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशा मागण्या राज्य शासनाकडे केल्या असल्याचे ते म्हणाले.