परभणी : पडीक माळरान म्हणून दुर्लक्षित असलेल्या जागेविषयी फारसे महत्त्व नसले तरी हे माळरान विविध पक्षी आणि प्राण्यांचा अधिवास असतो. मात्र मागच्या काही वर्षांपासून शहराजवळील पडीक माळराने भुईसपाट करण्याची प्रवृत्ती वाढल्याने या माळरानावरील प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.
२२ मे रोजी जैवविविधता दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध प्राणी, पक्षी यांच्या अधिवासांचा अभ्यास करणाऱ्या जिंतूर येथील पक्षिमित्र अनिल उरटवाड यांच्याशी संवाद साधला. उरटवाड यांनी सांगितले, विविध जिवांचा एकत्रित समूहाला जैवविविधता असे संबोधले जाते. पर्यावरणाच्या संवर्धनात या प्रत्येक घटकाचे महत्त्व आहे. त्यामुळे ही जैवविविधता जपणे, संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिंतूर तालुक्याच्या परिसरात असलेल्या माळरानावर अशी जैवविविधता पहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे किटक, सरपटणारे पक्षी, प्राणी, हरीण, काळवीट, कोल्हा, तरस, निलगाय, लांडगा, बिबटे आदी वन्य जीव वास्तव्याला होते. परंतु, या माळरानांकडे बिनकामाची जागा असल्याचे समजून ही माळराने भुईसपाट करण्यात आली. प्लाटिंग पाडून सिमेंटची घरे बांधली जात आहेत. त्यामुळे माळरानावरील वन्यजिवांचा अधिवास संपुष्टात येत आहे. त्याचप्रमाणे सरकारी योजना राबविण्यासाठीही पडीक गायरान जमिनीवर वृक्षलागवड केली जाते. शास्त्रीय दृष्टिकोन न पाहता सरसकट वृक्षलागवड करणेदेखील चुकीचे आहे. त्यामुळे माळरानांवर झाडे लावतानाही त्या भागातील जैवविविधता लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जैवविविधता वाचविण्यासाठी काय करावे
स्थानिक नागरिकांच्या सहभागातून माळरानावरील मोजक्या ठिकाणी चराऊ कुरणाचे व्यवस्थापन केल्यास माळरानावरील जैवविविधता धोक्यात येणार नाही. गावकऱ्यांनी स्वत:हून उर्वरित जमिनीवर चराई बंदी, कुऱ्हाड बंदी आणि वणवा बंदी केली पाहिजे.
माळरानावर आढळणारे वन्यजीव
जिंतूर तालुक्यातील माळरानांवर कोल्हा, खोकड, तरस, निलगाय आदी वन्यजीव आढळतात.
माळरानांवरील वन्यजिवांच्या अधिवासाबाबत ग्रामस्थांना माहिती देऊन या अधिवासाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. जैवविविधता दिनानिमित्त जनजागृतीसारखे उपक्रम हाती घेतले पाहिजेत.
अनिल उरटवाड, वन्यजीव अभ्यासक