परभणी : शहरातील रमाई नगर येथे दोघांना काठीने मारहाण केल्याप्रकरणी २५ मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नंदू दादाराव ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आकाश भगवान वाकळे याने १६ मार्च रोजी रात्री १०च्या सुमारास त्यांचा मुलगा रोहन याला जुन्या वादातून काठीने मारहाण केली. यावेळी वाद सोडविण्यास गेल्यानंतर आकाश वाकळे याने हातातील काठीने नंदू ढवळे यांनाही मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अन्य काहींनी यावेळी येऊन सोडवासोडव केली. दरम्यान, दुखापत झाल्याने ढवळे यांनी दवाखान्यात उपचार घेतले व त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात मारहाणीबाबत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी आकाश वाकळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.