याप्रकरणी पीडित महिलेने सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी सय्यद फैय्याज सय्यद करीम (वय ३२, रा.करीमनगर, परभणी) याने लग्नाचे आमिष दाखवून सेलू शहरातील लॉजसह परभणी, औरंगाबाद येथे नेऊन सतत अत्याचार केला. पीडित महिला ही शिक्षिका असून, ती आपल्या आई व दोन मुलांसह औरंगाबाद येथे राहते. नातेवाईकांच्या ओळखीने तिची आरोपीसोबत ओळख झाली. पीडितेला औरंगाबाद येथील नोकरी सोडून परभणी येथे नोकरी करण्यास आरोपीने भाग पाडले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. पीडितेने लग्नाविषयी विचारणा केल्यावर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आरोपी सय्यद फैज्जान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक जटाळ, रामेश्वर मुंढे, बालासाहेब लिंगायत यांचे पथक तपास करत आहे.
औरंगाबाद येथील शिक्षिकेवर सेलूत अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:19 IST