शहरात एकूण ४ गॅस एजन्सीज असून, त्यामध्ये साधारणता ८० ते ९० डिलिव्हरी बॉय काम करतात. सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी संसर्ग काळात जीवावर उदार होऊन डिलिव्हरी बॉय यांनी घरपोच सेवा दिली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाने गॅस सिलिंडर वितरकांना प्राधान्याने लसीकरण करण्याचे पत्र आरोग्य विभागाला देऊनही केवळ ५० टक्के वितरक डिलिव्हरी बॉय यांचे लसीकरण झाले आहे. अनेकांना दुसरी लस मिळाली नाही. अशा परिस्थितीत पूर्ण काळजी घेऊन हे कर्मचारी गॅस पुरवठा करतात. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी गॅस वितरित करणाऱ्या डिलिव्हरी बॉईज यांचे शंभर टक्के लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सिलिंडरही सॅनिटाईज करूनच
गॅस सिलिंडर वितरित करताना आम्ही पूर्ण काळजी घेतो. प्रत्येक सिलिंडर सॅनिटाईज करणे, सिलिंडर वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने पूर्ण ती काळजी घेतली जात असल्याचे येथील गॅस एजन्सी चालकांकडून सांगण्यात आले.
डिलिव्हरी बॉय म्हणतात
अत्यावश्यक सेवेत असतानाही लसीकरणासाठी खूप त्रास सहन करावा लागला. लसीचा एक डोस घेतला असून, दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाने गॅस वितरित करणाऱ्यांना प्राधान्याने लस देणे आवश्यक आहे.
भास्कर सोनवणे
कोरोना संसर्गाच्या काळात आम्ही गॅस वितरणाचे काम करीत आहोत. घराबाहेर पडताना सर्व ती काळजी घेतली जाते. सॅनिटायझर आणि मास्कचा वापरदेखील करीत आहोत. लसीचा एक डोस घेतला असून, दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाने दुसरा डोसही प्राधान्याने द्यावा.
अन्वर शेख
एकही डिलिव्हरी बॉय नाही पॉझिटिव्ह
परभणी शहरात चार गॅस एजन्सीज आहेत. त्यात साधारणता ८० कर्मचारी गॅस सिलिंडर वितरणाचे काम करतात. त्यापैकी आतापर्यंतच्या काळात एकही कर्मचारी पॉझिटिव्ह आला नाही. जिल्ह्यात मात्र काही कर्मचारी पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.