मानवत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात भुईमुगाच्या शेंगांची आवक १६ मे पासून सुरू झाली असून, ३ दिवसांत १ हजार क्विंटल शेंगांची आवक झाली असल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे.
उन्हाळी पेरणीनंतर भुईमुगाचे पीक हाताला आल्यावर उत्पादक शेतकरी भुईमूग बाजारपेठेत विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. १७ मे पासून बाजार समितीच्या यार्डातील आडत दुकानदार भुईमुगाच्या शेंगांची खरेदी करीत आहेत. मागील दोन दिवसांत १ हजार क्विंटल शेंगांची आवक बाजार समितीच्या यार्डात झाली आहे. १८ मे रोजी भुईमुगाच्या शेंगांना ४ हजार ४०० ते 5 हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. झालेल्या लिलावात अडत संघटनेचे अध्यक्ष आश्रोबा कुऱ्हाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर मोरे, राधाकिशन शिंदे, संजय लड्डा, माजी संचालक दिनकर कोक्कर, श्रीकिशन सारडा, नितीन कत्रुवार, वामनराव कोक्कर, गंगाधर मोरे, रहीम भाई, संजय यादव, बाळू बांगड, दामोदर बांगड, विजय पोरवाल, बापूराव चिंचलवाड, राजू काबरा, गुलाबसिंग ठाकूर आदी अडत व्यापारी खरेदीदार सहभागी झाले होते.
तीन तालुक्यांतील आवक
मानवत बाजारपेठेत परभणी, सोनपेठ, पाथरी व सेलू तालुक्यातील भुईमूग उत्पादक शेतकरी आपला माल विक्री करण्यासाठी आणत असल्याचे चित्र बाजार समितीत दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात १७ मे पासून बाजार समितीच्या यार्डात अडत दुकाने सुरू राहणार असल्याने येत्या काही दिवसांत सर्व मालाची आवक वाढण्याची शक्यता आहे.