दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. परिणामी जिल्ह्यामध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होत असताना दुसरीकडे हृदयविकार, सर्पदंश, अपघात यासह इतर आजारांतील रुग्ण तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांत पुरेशी यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने कोरोना नसलेल्या रुग्णांची परवड सुरू आहे.
१९ खासगी रुग्णालयांत कोविडचे उपचार
परभणी शहरात विविध आजारांवर वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांसह इतर अशा १९ खासगी रुग्णालयांमध्ये सद्य:स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शहरात एकूण २२ खासगी रुग्णालये असून, त्यातील १९ रुग्णालयांमध्ये कोविडबाधितांवर उपचार सुरू आहेत.
त्यामुळे कोरोना वगळता इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर दोनच खासगी रुग्णालये उपलब्ध आहेत. त्यामुळे इतर रुग्णांना बेड कमी पडू लागले आहेत. परिणामी जिल्हा प्रशासनाने कोरोना वगळता इतर आजारांसाठी काही रुग्णालये राखीव ठेवावीत, अशी मागणी होत आहे.
कोरोना संसर्गाच्या आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात ८०० बाह्य रुग्ण व ४०० अंतर रुग्णांवर प्रत्येक दिवशी उपचार केले जात होते. मात्र, कोरोना विषाणूच्या नंतर सद्य:स्थितीत १५० बाह्य, तर ८० अंतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अपघात व अत्यावश्यक रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.
- बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा शल्यचिकित्सक, परभणी
दररोज ३० ते ३५ रुग्णांना जावे लागते माघारी
कोरोना वगळता इतर आजारांवर उपचार करण्यासाठी केवळ दोनच रुग्णालये उपलब्ध आहेत. या रुग्णालयांमध्ये असलेल्या बेडची संख्या जवळपास ४८ एवढी आहे. त्यामुळे अपघात यासह पोटाचे आजार, हृदयविकार यासह इतर आजारी रुग्णांना उपचाराअभावीच माघारी फिरावे लागत असल्याचे दिसून येत आहे.