लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात अभाव असून, आरोग्यविषयक सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे तातडीने मनुष्यबळ आणि या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजली आणेराव यांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्ह्यातील आरोग्यविषयक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी डॉ. रंजना सोळंकी आणि डॉ. दिनेश बाबू एस. हे दोन अधिकारी दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजली आणेराव यांनी पथकातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोग्य परिस्थिती सुधारण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देण्याची मागणी केली.
प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर आदी पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे दर्जात्मक आरोग्य सेवा पुरवणे कठीण जाते. कोविड काळात या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील रुग्णांना संदर्भ सेवा देण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका या १५ वर्षांपूर्वीच्या असल्याने वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे नवीन रुग्णवाहिकांचा पुरवठा करावा, आरोग्य केंद्रात सफाईगार हे पद मंजूर असतानाही मागील अनेक वर्षांपासून ते भरलेले नाही तसेच परिचरची चार पदे मंजूर असतानाही अनेक ठिकाणी ही पदे रिक्त आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यासाठी रुग्णकल्याण समितीला १ लाख ६० हजार रुपयांचा निधी उपलब्ध होतो; परंतु हा निधी रुग्णवाहिकेवरील चालक आणि कनिष्ठ सहाय्यकांच्या मानधनासाठीच वापरावा लागतो. त्यामुळे निधी अपुरा पडतो. त्यामुळे निधी वाढवून द्यावा, आयपीएचएस अंतर्गत पूर्वी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला जात होता. सद्यस्थितीत केवळ ८० हजार रुपये उपलब्ध होत आहेत. हा निधी निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होत असल्याने इतर केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करणे कठीण जात आहे. तेव्हा आयपीएचएस अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा, नव्याने निर्माण झालेल्या चिकलठाणा, आर्वी, मरडसगाव, शेळगाव, बनवस या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरावीत, आदी मागण्या आणेराव यांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.