परभणी : शहरातील जायकवाडी परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या आरोपीस नवा मोंढा पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील जायकवाडी परिसरात १ फेब्रुवारी रोजी सकाळी जयवंत पवार या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्याच्या गळ्यावर वार असल्याने हा खुनाचा प्रकार असावा, असा संशय बळावला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच दिवशी रात्री पोलिसांनी आरोपीचा शोध घेत एका संशयितास अटक केली. रवी उडाणशीव असे अटक केलेल्या संशयियताचे नाव आहे. त्यास मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली.