परभणी : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने हाहाकार उडविला असून, पालम, पाथरी, मानवत या तालुक्यांत ओढ्यांना पूर आल्याने ८ गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली असून, पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
दोन आठवड्यांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. सोमवारी रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. पालम, पाथरी या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, आरखेड, घोडा, फळा, उमरथडी या गावांचा पालम शहराशी असलेला संपर्क सोमवारपासून ठप्प आहे. मंगळवारीही या पुलावर पाणी होते. पाथरी तालुक्यात मात्र सोमवारच्या पावसाने हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील हादगाव मंडळात १३० मि.मी., तर कासापुरी मंडळात १०६ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे पाथरी, सेलू, मानवत, पालम आदी भागांत पूरस्थितीमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाले होते. पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांतील पिके पाण्याखाली गेली असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हादगावात घुसले पाणी
पाथरी तालुक्यात हादगाव आणि कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश पाऊस
पाथरी - मंगळवारी पहाटे तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. हादगाव आणि कासापुरी मंडळात अतिवृष्टी झाली असून, ओढ्यांना पूर आला आहे. तसेच हादगाव येथील इंदिरानगर वसाहतीतील २५ घरांत पुराचे पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. ग्रामपंचायत कार्यालयातही पाणी शिरले होते. हादगाव बु. मंडळात १३० मि.मी. पाऊस झाला. पाथरी - आष्टी रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने १०० एकर शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच वडी येथील सोमेश्वर नदीला पूर आल्याने पाटोदा, निवळी, गोपेगाव या तीन गावचा संपर्क तुटला आहे. मरडसगाव ते हादगाव जोडणाऱ्या रस्त्यावर श्रीरामपूर वस्तीजवळ एका ओढ्याला पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. पाथरी-आष्टी-खेरडा राज्य मार्गावरील वाहतूकही काही काळ बंद होती.
कोल्हा ते कोथळा रस्त्यावरील वाहतूक बंद
मानवत : सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कोल्हा ते कोथळा रस्त्यावर असलेल्या धरमुडी नदीला पूर आल्याने सकाळी अकरा वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तालुक्यातील कोथळा, नरळद, टाकळी नीलवर्ण, सोमठाणा, राजुरा आदी नऊ गावातील ग्रामस्थ मानवतला येण्यासाठी कोल्हा ते कोथळा रस्त्याचा वापर करतात. धरमोडी नदीला पुन्हा पूर आल्याने या रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने ३१ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक बंद होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.