मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स या नियमांचे पालन केले जात असतानाच नागरिकांना प्रतिबंधक लसीकरणावरही प्रशासनाने भर दिला आहे.
जानेवारी महिन्यात जिल्ह्यात कोरोनाची लस प्राप्त झाली. त्यानंतर सुरुवातीच्या काळात शासकीय आणि खाजगी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लसीकरण केले जात असून, १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग हळूहळू वाढू लागला आहे.
लसीकरणाची माहिती कोविन ॲप आणि गुगल शीटवर नोंद केली जात आहे. जास्तीत जास्त लसीकरण कोविन ॲपच्या माध्यमातून व्हावे, असे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार कोविन ॲपनुसार जिल्ह्यात ६१ हजार ९६० नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. जिल्ह्यात आता लसीकरणासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात लसीकरण करणाऱ्यांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सुमारे ६ लाख नागरिक असून, या नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने समोर ठेवले आहे. त्यानुसार ठिकठिकाणी शिबिर घेऊन लसीकरण केले जात आहे.
साडेचार हजार नागरिकांनी घेतला दुसरा डोस
कोरोनाची लस प्रत्येकाला दोन टप्प्यात घ्यावी लागणार आहे. लसीचा पहिला डोस पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावयाचा आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६१ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, ४ हजार ८४४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
सर्वाधिक लसीकरण कोविन ॲपच्या माध्यमातून
कोरोनाचे लसीकरण करताना ते कोविन ॲपच्या माध्यमातून करावे, असे आरोग्य विभागाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात त्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
कोविन ॲपनुसार ६१ हजार ९६० नागरिकांनी आतापर्यंत कोरोना लस घेतली आहे, तर गुगल शीटवर लस घेतलेल्यांची संख्या ६१ हजार ९७४ एवढी आहे. केवळ १४ जणांनीच कोविन ॲप न वापरता लसीकरण केले.
कुठे किती झाले लसीकरण?
परभणी ६१,९६०
औरंगाबाद १,६१,३४९
लातूर १,०१,७४८
जालना ६६,९०६
हिंगोली ३९,४४४
बीड ९९५६१
नांदेड १,०१,२३९
उस्मानाबाद ५३,९१०