राज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील सीबीएसई बोर्डाच्या विविध शाळांमधील ५२१ विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामध्ये ३२५ मुले तर १९६ मुलींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयाबाबत अनेक पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पद्धत असणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षा नसतील तर विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी कळणार? असा सवाल काही पालक व शिक्षण तज्ज्ञांमधून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे काही पालकांनी या निर्णयाचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.
११ वी/आयटीआय प्रवेश कसे होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा न देताच दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने ११ वी प्रवेश होणार असले तरी आयटीआय व इतर अभ्यासक्रमाला प्रवेश कसे देण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष लागले आहे.
नापास न करण्याचा यापूर्वी झाला होता निर्णय
सीबीएसई बोर्डाच्या निर्णयानुसार दहावीच्या परीक्षेत पास किंवा नापास हे ठरविण्यासाठी परीक्षेच्या सर्व विषयांपैकी फक्त ५ विषय ज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत. त्याचा विचार करून पाच विषयात पास म्हणजेच दहावी पास, असा निर्णय यापूर्वी झाला आहे.
सीबीएसईचा निर्णय अयोग्य आहे. कारण उच्च दर्जाच्या शिक्षण पद्धतीत यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची कमी होईल. परीक्षेचे महत्त्व वाटणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी परीक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करावा.
- प्रा. प्रमोद ढालकरी, पालक.
दहावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. परीक्षा न झाल्यास विद्यार्थ्याची बुद्धीमत्ता कशी समजेल? वर्षभर अभ्यास करावा लागतो. त्यातूनच यश मिळते, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रूजली पाहिजे. सीबीएसई बोर्ड असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करीत आहे.
- दादाराव ताठे, पालक.
कोरोनाची स्थिती सर्वत्र गंभीर आहे, हे मान्य आहे; परंतु थेट परीक्षाच रद्द करणे चुकीचे आहे. सीबीएसई बोर्डाने अत्यंत घाईत हा निर्णय घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना असा निर्णय झाला नाही. मग सीबीएसई बोर्डाला घाई का झाली?
- भुजंग थोरे, पालक.
सीबीएसई बोर्डाचा निर्णय चुकीचा आहे. यामधून विद्यार्थ्याचे मूल्यांकन होणार नाही. गुणवान विद्यार्थ्याचे खच्चीकरण करणारा हा निर्णय आहे. असा निर्णय घेण्यापूर्वी बोर्डाने पालक, शिक्षकांशी चर्चा करायला पाहिजे होती. धोका पत्करून अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले होते.
- रमेश कापसे, शिक्षक.