गंगाखेड तालुक्यातील पिंप्री येथील टेम्पो चालक बबलू शेख सुलतान याला त्याच्या आईने दागिने सोडवून आणण्यासाठी ४८ हजार रुपये दिले होते. दुपारी १ च्या सुमारास ते वाहनासह गंगाखेड येथील परळी नाका येथे थांबले असता एमएच २५ झेड ३६५४ क्रमांकाच्या दुचाकीवर एक व्यक्ती तेथे आला. त्याने नांदेडला पेंड आणण्यासाठी जायचे आहे, म्हणून २ हजार २०० रुपये भाडे ठरविले. त्यानंतर त्यांच्या टेम्पोमध्ये अन्य दोघे बसले. आणि दुचाकीवरील व्यक्ती त्यांच्या पाठीमागून येऊ लागला. काही अंतरावर गेल्यावर टेम्पोमधील एकाने डब्बा विसरला आहे. आणण्यास परत जाऊ, म्हणाल्याने शेख यांनी टेम्पो तेथेच थांबवून लॉक केला. त्यानंतर ते दुचाकीवर काही अंतर गंगाखेडच्या दिशेने गेले. मध्येच दुचाकी बंद पडल्याचे सांगून दुचाकी ढकलत एका गॅरेजपर्यंत त्यांनी आणली. दुचाकी दुरूस्त केल्यानंतर ते त्यांच्यासमवेत दुचाकीवर टेम्पो उभा केलेल्या ठिकाणी आले. तेथे टेम्पो चालक बबलू शेख यांना सोडले. व त्यांची नजर चुकवून तिघेही दुचाकीवर निघून गेले. काही वेळाने शेख यांनी त्यांच्या खिशात पाहिले, असता खिशातील ४८ हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. दुचाकीवरील तिघांनी त्यांचे पैसे चोरल्याचे लक्षात आल्यानंतर बबलू शेख यांनी ९ ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून तीन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
टेम्पो चालकाचे ४८ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST