परभणी : जिल्ह्यात मंगळवारी ३५६ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे १२ रुग्णांना कोरोनाची कोणतेही लक्षणे नसल्याने त्यांना सुटी देण्यात आली.
मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. रुग्णांची संख्या घटल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आरोग्य विभागाने दिवसभरात ३५६ नागरिकांच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. आरटीपीसीआरच्या साह्याने २८० नागरिकांची तपासणी करण्यात आली तर रॅपिड टेस्टच्या साह्याने ७६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आता एकूण ७ हजार ४९६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ हजार ७६ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. २९९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, सध्या १२१ रुग्ण उपचार घेत आहेत.
परभणी शहरातील विष्णूनगर येथील १५ वर्षांची मुलगी, सिंचननगरातील ५४ आणि ३० वर्षांची महिला, लक्ष्मीनगरातील ६५ वर्षे वयाची महिला, तालुक्यातील कोथळा येथील २५ वर्षांचा युवक, आचार्यनगरातील ८० वर्षांचा वृद्ध, रामकृष्णनगरातील ३७ वर्षांचा पुरुष, स्टेशन रोड भागातील ५८ वर्षे वयाचा पुरुष, लोकमान्यनगरातील २७ वर्षांचा युवक, पूर्णा तालुक्यातील उक्कलगाव येथील २६ वर्षांचा युवक, गंगाखेड शहरातील परळी रोड भागातील २१ वर्षांची युवती, २८ वर्षांचा युवक आणि पाथरी तालुक्यातील कानसूर येथील २८ वर्षांची युवती कोरोनाबाधित झाली आहे.
बाधितांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक
मंगळवारी नोंद झालेल्या १३ रुग्णांमध्ये ९ रुग्ण परभणी तालुक्यातील, २ गंगाखेड तालुक्यातील आणि पाथरी व पूर्णा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या १३ रुग्णांमध्ये ८ रुग्ण ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.