परभणी : सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर १०० टक्के भरलेल्या मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये अवघ्या चार महिन्यांत ३० टक्के पाण्याचा उपसा झाला असून, आगामी उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता, या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्प, गाव तलाव आणि मध्यम- लघू प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी भासेल, अशी अपेक्षा आहे. मात्र प्रकल्पांमध्ये साठा झालेल्या पाण्याचा उपसा करण्याचा वेग कसा आहे? यावर पाण्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात १६.९६५ दलघमी पाणीसाठा शिल्लक रााहिला आहे. त्याची टक्केवारी ६८.१ टक्के आहे. या प्रकल्पातून चार महिन्यांमध्ये ३२ टक्के पाण्याचा उपसा झाला आहे, तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात २५.९४ दलघमी पाणी शिल्लक असून, या प्रकल्पातून ३० टक्के पाण्याचा आतापर्यंत उपसा झाला आहे. दोन्ही मध्यम प्रकल्पांवर अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना चालतात. त्याचप्रमाणे शेतीच्या सिंचनासाठी पाणी दिले जाते. यावर्षीच्या रबी हंगामात या प्रकल्पातून मुबलक पाणी मिळाल्याने रबी हंगामात पिकांची स्थिती चांगली आहे.
गोदावरी नदीवरील बंधारेही पावसाळ्यात पाण्याने तुडुंब झाले होते. मात्र या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला आहे. पाथरी येथील ढालेगाव बंधाऱ्यातून २४ टक्के, मुदगल बंधाऱ्यातून ३८ टक्के, तारुगव्हाण बंधाऱ्यातून ३१ टक्के आणि डिग्रसच्या उच्च पातळी बंधाऱ्यातून २९ टक्के पाण्याचा चार महिन्यांमध्ये उपसा झाला आहे. सध्या ढालेगाव बंधाऱ्यात ९.९८, मुदगल बंधाऱ्यात ७.०६, तारुगव्हाण १०.३८ आणि डिग्रस बंधाऱ्यात ४५.५५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
लघू प्रकल्पांतून सर्वाधिक पाणी उपसा
जिल्ह्यात २२ लघू प्रकल्प आहेत. त्या भागातील गावांची पाणीपुरवठ्याची जबाबदारी या प्रकल्पांवर आहे. मात्र या प्रकल्पांतून ६६ टक्के पाण्याचा उपसा आतापर्यंत झाला आहे. या प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीला १४.५१ दलघमी (३४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. २२ लघू प्रकल्पांमध्ये एका प्रकल्पातील पाणीसाठा ज्योत्याखाली आहे. २५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असलेले दोन प्रकल्प आहेत. सात प्रकल्पांत २६ ते ५० टक्के, १० प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के आणि दोन प्रकल्पांत ७६ ते १०० टक्के पाणीसाठा आहे.
मोठ्या प्रकल्पांतील जीवंत पाणीसाठा
येलदरी : ६८०.४४ ८४ टक्के
निम्न दुधना : २०४.६७२ ८४.५ टक्के
करपरा मध्यम : १६.९६ ६८.१ टक्के
मासोळी मध्यम : १९.०० ७० टक्के