परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी या आगारांचा समावेश आहे. या आगारांमध्ये सद्य:स्थितीत २२१ बसची संख्या असून या बसमधून जिल्ह्यातील प्रवाशांची ने-आण करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एसटी महामंडळाच्या सर्वच बस सहा महिन्यांहून अधिक काळ एकाच ठिकाणी उभ्या राहिल्या. सद्य:स्थितीत दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी होत आहे. मात्र, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाची सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. १ जूनपासून सुरू झालेली एसटी महामंडळाची सेवा अद्यापही प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. सद्य:स्थितीत २२१ बसपैकी केवळ १७० बस रस्त्यावरून धावत आहेत. त्यामुळे बससेवा सुरू होऊन २६ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही ७६ टक्के बस रस्त्यावरून धावत आहेत. त्यामुळे २३ टक्के बस अद्यापही आगारातच उभ्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा साहारा घेऊन आपला प्रवास पूर्ण करावा लागत आहे.
पूर्णक्षमतेने बस कधी सुरू होणार?
परभणी जिल्ह्यातील चार आगारांमधून ग्रामीण भागातील जवळपास ६० हून अधिक खेडेगावात बस अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे या प्रवाशांना खासगी वाहतुकीचा साहारा घेऊन आपला प्रवास पूर्ण करावा लागत आहे. गंगाखेड, पाथरी, जिंतूर व परभणी आगारांतील प्रशासनाने तातडीने पावले उचलत ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पूर्ण क्षमतेने बस सुरू करून ज्या गावात बस अद्यापही सुरू झालेली नाही. त्या गावातील प्रवाशांच्या सेवेसाठी बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
तोटा सहन करत बस रस्त्यावर
परभणी आगारातील जिल्ह्यातील चार आगारांमधून १७० बस रस्त्यावरून धावत आहेत. मात्र, या बस मध्येही पूर्ण क्षमतेने प्रवासी प्रवास करत नसल्याने एसटी महामंडळाला अनलॉक होऊन २६ दिवसांनंतरही तोटाच सहन करत बस रस्त्यावरून धावत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पूर्णक्षमतेने बस सुरू होणार नाहीत. तोपर्यंत एसटी महामंडळाला तोटाच सहन करावा लागणार आहे.