तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालयामार्फत लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. प्राप्त लसीच्या संख्येनुसार लसीकरण सुरू आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट असतानाही आरोग्य विभागाचे लसीकरण सुरू होते. आरोग्य केंद्राव्यतिरिक्त गावोगावी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. आरोग्य विभागाने दिलेल्या १५ मे पर्यंतच्या अहवालानुसार पूर्णा शहरासह तालुक्यातील ९४ गावांमध्ये लसीकरण पोहोचले आहे. तालुक्यात १९ हजार ४२६ नागरिकांनी लस घेतली आहे, तर पुढील कालावधीदरम्यान अंदाजे १ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. २७ मे पर्यंत तालुक्यातील कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे. लसीकरण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत १० हजार ७६४ पुरुषांनी, तर ८ हजार ६६१ महिलांनी कोरोनाची लस घेतली. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी देण्यात आल्या आहेत. लसीकरण कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकांसोबतच २ हजार ३०० फ्रंटलाइन वर्कर्स, तर ११३० हेल्थ वर्कर्सचाही समावेश आहे. पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांत कमालीची तफावत आहे. दुसऱ्या डोससाठी लसीचा पुरवठा कमी होत असल्याने अनेकांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागत आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १६ हजार, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ३ हजार ३३६ एवढी आहे. नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती सुरू असून, विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.
लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण कमी
पूर्णा तालुक्याची एकूण लोकसंख्या पाहता झालेले लसीकरण अतिशय कमी प्रमाणात आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची गती वाढविणे गरजेचे आहे. लसीकरण कामासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, आरोग्य विस्तार अधिकारी अविनाश बेलोकर, आरोग्य विभागाचे चंद्रकांत काकडे, आरोग्य सेविका उज्ज्वला आवटे, सुषमा वारुळे, माधव अवरगंड, ब्रह्मगिरी गुट्टे, कृष्णा चापके, आरोग्य सेवक शेख शफी, ऑपरेटर स्वाती पोनगंट्टी आदी परिश्रम घेत आहेत.