कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक असताना जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच दिवसरात्र कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्या कोरोना योद्ध्यांनाच लस मिळेना झाली आहे. जिल्ह्यातील १० हजार १२ पहिला डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार ८५३ जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही. तर फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या १९ हजार १३ कर्मचाऱ्यांपैकी १२ हजार २९२ जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
४५ वर्षांवरील १ लाख १३ हजार नागरिक वंचित
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील १ लाख ४१ हजार १३९ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यातील फक्त २७ हजार ८९३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. या वयोगटातील तब्बल १ लाख १३ हजार २४६ जणांनी अद्याप लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही.
लसीची टंचाई
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा गेल्या अनेक दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर झाला आहे. त्यामुळे सध्यस्थितीत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. शिवाय ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पुरेशी लस नसल्याने या वयोगटातील नागरिकांनाही दररोज टोकन देऊन मोजक्याच प्रमाणात लस दिली जात आहे.