परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग अजूनही कायम असून, मंगळवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ६१९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
मागील आठवड्यात बाधित रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली होती. मात्र ११ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालात ही संख्या पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी झालेली नाही. मंगळवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयात ५, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ६ जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात ६ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या १८ रुग्णांमध्ये ११ पुरुष आणि ७ महिलांचा समावेश आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मंगळवारी वाढल्याने चिंता कायम आहेत. आरोग्य विभागाला २ हजार ५९४ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या २ हजार ८३ अहवालांमध्ये ४६७ आणि रॅपिड टेस्टच्या ५११ अहवालांमध्ये १५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४३ हजार ९६३ झाली असून, त्यापैकी ३४ हजार ५६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १,०५३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार ३४४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात २१८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १३१, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २३९, अक्षदा मंगल कार्यालयात ४३ आणि रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ४ हजार १९६ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
९२८ रुग्ण कोरोनामुक्त
मंगळवारी दिवसभरात ९२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील काही दिवसापासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.