परभणी : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कामकाज संकल्पनेंतर्गत सात कलमी कृती कार्यक्रम अभियान राबविण्यात आला. यामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी अंमलात आणला. सी-नेत्रा संकल्पनेतून जिल्ह्यातील ३६९ गावांत एकूण १५३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुधन चोरी, शेतकऱ्यांची शेती औजार चोरी, गावात किरकोळ गोष्टीवरून होणारी भांडणे, महिला-मुलींची सुरक्षा या दृष्टीने प्रभावी माध्यम म्हणून तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
सी-नेत्रा म्हणजे कम्युनिटी नेटवर्क फॉर रुरल एरिया. गावातील कायदा व सुव्यवस्था, शांतता राखण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी पोलीस पाटील यांच्या माध्यमातून सी-नेत्रा ही संकल्पना प्रभावीपणे जिल्ह्यात राबविली. याबाबत फेब्रुवारी महिन्यात बैठक घेऊन सर्व पोलीस पाटील यांना पुढाकार घेऊन जनसहभागातून किमान दोन कॅमेरे गावात बसविण्याचे आवाहन करण्यात आले. यात समाजसेवी संस्था ग्रामपंचायत कार्यालय, लोकसहभाग आणि पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद अशा सर्वांनी महत्त्वाच्या ठिकाणावर गावात कॅमेरे बसविण्यासाठी नियोजन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर यांनी या अभियानात १४ गावांमध्ये ५६ सीसीटीव्ही बसविले. नागरिकांनी लोकसभागातून विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
असे आहे कॅमेऱ्यांचे वर्गीकरण
पोलीस पाटील यांच्याकडून स्वयंस्फूर्तीने स्वखर्चातून २८५ कॅमेरे समाजसेवी संस्था यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालयाकडून ५९० जिल्हा परिषदेकडून ५६ तर लोकसहभागातून ५०४ कॅमेरे बसविले आहेत.
या बाबींवर राहणार लक्षगावातील महापुरुषांचे पुतळे, धार्मिक स्थळ, गावाचे प्रवेशद्वार, महत्त्वाचे चौक, रस्ते अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसविले असून त्याची दैनंदिन पाहणी व डाटा साठवणूक हे जबाबदार व्यक्तीसोबत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांच्याकडे असणार आहे.
पोलीस ठाणेनिहाय गावातील सीसीटीव्ही
परभणी ग्रामीण २१४ताडकळस ८२
दैठणा ११७पूर्णा ४०
पालम ७०चुडावा ३४
गंगाखेड ९६सोनपेठ १२९
पिंपळदरी ६३सेलू ६४
पाथरी २४४मानवत ७१
जिंतूर ८०चारठाणा २३
बामणी ३५बोरी १७४
एकूण १५३६
यांनी राबविली संकल्पना
पोलीस अधीक्षक कार्यालयातील यंत्रणेने नियोजन व व्यवस्थापन यासाठी केले. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे ठाणेदार, अंमलदार गणेश कौटकर, दीपक आल्हाट यांच्यासह पोलिस पाटलांनी ही संकल्पना राबविली.