परभणी : आपत्कालीन स्थितीत रुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकेने गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ११ हजार रुग्णांना जीवदान दिले आहे.
अपघात किंवा आपत्कालीन घटना घडल्यानंतर संबंधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने १०८ क्रमांकावर फोन केल्यानंतर सर्व सुविधा युक्त रुग्णवाहिका संबंधित ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. या सेवेचा राज्यातील हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. अनेकांचा यामुळे प्राण वाचला आहे. या अनुषंगाने कोरोनाच्या कालावधीत गेल्या आठ महिन्यांत या रुग्णवाहिकेचा जिल्ह्यातील ११ हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्यामध्ये ७ हजार ७४५ कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १३ रुग्णवाहिका असून, त्यावर २६ चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेला बदली चालक देण्यात आल्याने त्यांच्यावरील कामाचा ताणही कमी होईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
कोरोना काळात महत्त्वाची भूमिका
२२ मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांना दवाखान्यात पोहोचविण्याची मोठी जबाबदारी या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने पार पाडली. प्रारंभीच्या काळात कोरोना रुग्णांविषयी सर्वसामान्यांत भीती असताना या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कर्तव्यात कधीही कसूर केला नाही.
पुण्यातून व्यवस्थापन
१०८ या क्रमांकावरून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेच्या कामाकाजाचे पूर्ण व्यवस्थापन पुणे येथून केले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात या अनुषंगाने अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गरजू नागरिकांनी सदरील नंबरवर फोन केल्यानंतर त्यांचा फोन पुणे कार्यालयाशी जोडला जातो. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते.
सहा वर्षांत ९० हजार जणांना लाभ
राज्यात २०१४ मध्ये १०८ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांना सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात या अनुषंगाने नोव्हेंबर अखेरपर्यंत ९० हजार ४९२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका हजारो रुग्णांसाठी तातडीने उपचार उपलब्ध करून देत जीवनदायी वाहिनी ठरली आहे.