गंगाखेड तालुक्यातून ७० किलोमीटर अंतर परिसरात गोदावरी नदी वाहते. या नदीमधून मागील अनेक दिवसांपासून वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात वाळूउपसा करतात. विशेष म्हणजे महसूल प्रशासनाने कारवाया केल्यानंतरही गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळूउपसा कमी झालेला नाही. २०२० या एका वर्षामध्ये वाळूमाफियांनी अवैध वाळूउपसा करून साठवून ठेवलेले वाळूसाठे महसूल प्रशासनाने जप्त केले. जप्त केलेले वाळूसाठे बाजारभावाने विक्री करून महसूल मिळविला. २०२० मध्ये महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या वाळूसाठ्यांची विक्री करून १० लाख ४० हजार ७१० रुपयांचे स्वामित्वधन वसूल केले आहे. यामध्ये जानेवारी २०२० या महिन्यात ४५ हजार रुपये, फेब्रुवारी महिन्यात ८८ हजार रुपये, मार्च महिन्यात २७ हजार ५०० रुपये, एप्रिल महिन्यात ५ हजार रुपये, मे महिन्यात ४९ हजार ८०० रुपये, जून महिन्यात ३ लाख ४७ हजार ५१० रुपये, ऑगस्टमध्ये ४९ हजार ९०० रुपये, डिसेंबरमध्ये ४ लाख २८ हजार असे एकूण १० लाख ४० हजार ७१० रुपये वाळूसाठ्यातून स्वामित्वधनाची रक्कम मिळविली आहे.
जप्त वाळूसाठ्यातून १० लाखांची रॉयल्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST