- राहुल बनसोडे
स्थळ : कॉलेजचा एक निवांत कट्टातारीख : डिसेंबर 16साल : 1999वय : एफ.वाय. बी.ए. सोबत : दोन मैत्रिणी, एक मित्र
विषय : समोर लोकमत वृत्तपत्राच्या अंकात आलेल्या दोन जाहिराती. एका जाहिरातीत जागतिक बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याची कुठल्याशा सॉफ्टवेअर कंपनीची जाहिरात. दुसर्या जाहिरातीत सलमान खान या सुपरस्टारची कुठल्याशा बाइकची जाहिरात.
दोन्हींचा आकार एकच पण ज्या लोकांना उद्देशून ती जाहिरात केली जाते आहे त्या लोकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा. चर्चा अर्थात विश्वनाथन आनंद मोठा की सलमान खान. मला सलमान खान आवडत नाही हे एका मैत्रिणीला प्रचंड खटकलं. म्हणजे मी तिच्या भावना दुखावल्या आहेत की काय इथपर्यंत तिचे भाव.
मैत्रीण : ‘विश्वनाथ आनंदला’ कुणी ओळखत नाही. बसल्या बसल्या चेस खेळण्यात काय कर्तृत्व? सलमान खान आज मोठा सुपरस्टार आहे, त्याच्याकडे अमाप पैसा आहे आणि पोरी त्याच्यावरून जीव ओवाळून टाकताय. विश्वनाथन आनंदच्या फोटोकडे पाहिलं तरी मला बोअर होतं. असल्या बोअर माणसाला अँडमध्ये घेतलं तरी कसं?
दुसरी मैत्रीण : तुला उगीच आपल्या बुद्धीचा गर्व बाळगायला म्हणून काहीतरी लागतं. स्टाइल मारायला की पाहा मला किती माहिती आहे. सलमान खानचे फॅन्स कसे तुच्छ आहेत.
मैत्रीण : उगीच कुणा सुपरस्टारवर जळायला काय अर्थ आहे? सलमान खानच्या बंगल्याबाहेर रोज किती गर्दी असते माहीत आहे?
मित्र(मैत्रिणीच्या बाजूने पण न्यायाधीशाच्या टोनमध्ये) : सलमान खान महत्त्वाचा. तुमच्या वादाला काही अर्थ नाही. सलमान खूप मोठा आहे. विश्वनाथन आनंद त्याच्यासमोर काहीच नाही.
एखादा माणूस महत्त्वाचा असणं म्हणजे तो दिसायला राजबिंडा वा राजकुमारी आणि पैशाने अति श्रीमंत असणं आवश्यक आहे अशी माझ्या मित्रानी त्याकाळी करून घेतलेली समजूत त्यांच्यासाठी तेव्हा जितकी खरी होती तितकीच आजही तरुण मुलांसाठी असावी. तरुणाईचे स्वत:चे असे काही स्टाइल आयकॉन असतात, रॉकस्टार, सुपरस्टार असतात आणि त्यांचा कोट्यवधींचा फॅनबेस असतो. या चौकटीत न बसणार्या तरुणाईचे आदर्श अनेकदा बहुतांशी लेखक, संशोधक किंवा अंतराळवीर असतात. अशा आदर्श पाळणा-याची संख्या एकूण तरुणांच्या संख्येच्या दहा टक्केही नसते. त्यामुळे त्यांचे म्हणणे कितीही बरोबर वा महत्त्वाचं असलं तरी ते इतर गोंगाटात दाबलं जातं. कॉलेज संपल्यानंतर हळूहळू तरुणांचे दोन भाग पडत जातात. ज्ञानाचा मार्ग निवडलेले पुढे आयुष्यभर काहीना काही नवं शिकतच राहातात आणि हिरो वर्शिपिंगच्या नादात अडकलेल्यांना पुढे इतर तडजोडी करून आयुष्यात स्थिर झाल्यानंतर पुन्हा एखाद्या नव्या हिरोच्या भक्तीत गुंतता येतं.
इथं कोण बरोबर कोण चुकीचं हा निष्कर्ष मांडण्याचा उद्देश नाही; पण गेली काही वर्षे या दहा टक्क्यातल्या लोकांना बरेच चांगले दिवस आले आहेत असं म्हणावंसं वाटतं. विश्वनाथन आनंद आज फारसा कुणाच्या लक्षात नसला तरी आजकालच्या बुद्धिवादी तरुणाईला नवे स्टार आयकॉन मोठय़ा प्रमाणावर मिळू लागले आहेत. त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे युवाल नोह हरारी.
या महिन्याच्या 16 तारखेला युवाल हरारी नुकतेच मुंबईला आले होते. त्यांच्या संध्याकाळच्या भाषणाच्या वेळी शांत आणि निवांत समजल्या जाणार्या मुंबईच्या उच्चभ्रू भागात भर संध्याकाळी ट्रॅफिक जाम झालं होतं. कार्यक्र मासाठी ठेवलेल्या सगळ्या खुच्र्या भरल्यानंतर काही लोकांनी खाली जमिनीवर बसून त्यांचं भाषण ऐकलं, तर ज्यांना खाली बसण्यासही जागा मिळाली नाही त्यांनी ते उभ्यानंही ऐकलं. एखाद्याला पाहण्यासाठी वा ऐकण्यासाठी इतकी गर्दी झाली म्हणजे युवाल हरारी कुणी चित्रपटाचे हिरो आहेत की काय, अशी तुम्हाला शंका येऊ शकते.
पण युवाल हरारी हे चित्रपटाचे हिरो नसून एक लेखक आहेत. इस्त्रायलमध्ये जन्माला आलेल्या आणि अवघे बेचाळीस वय असणा-या या लेखकाची सेपीयन्स, होमो ड्युयूस आणि ट्वेन्टी वन लेसन्स फॉर द ट्वेन्टी फस्र्ट सेंच्युरी ही तीन पुस्तकं सध्या जगभर खपाचे नवे उच्चाक ओलांडत आहेत. सेपीयन्स या पुस्तकाच्या एक कोटीहूनही अधिक प्रती विकल्या गेलेल्या असून, जगभर जिथे कुठे हरारी जातात तिथे त्यांना ऐकण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असते. याशिवाय मार्क झुकेरबर्ग, बील गेट्स आणि बराक ओबामा यांनीही सेपीयन्सची स्तुती केली असून, हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं असं सुचवलं आहे.
सध्याच्या वातावरणात जगभर ज्या काही महत्त्वाच्या चर्चा चालू आहेत त्यामध्ये सेपीयन्स हे महत्त्वाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचा विषय तसा म्हटला तर सोपाच आहे. माणूस नावाच्या प्रजातीचा गेल्या दोन लाख वर्षांचा इतिहास. एरवी इतिहास म्हटलं की आपल्याला व्हॉट्सअँपवर आपापल्या जातीच्या आणि धर्माच्या महान गोष्टी सांगणा-या कितीतरी ऐतिहासिक गोष्टी रोज येतच असतात. हरारी यांच्या पुस्तकातला इतिहास या सर्वांपेक्षा वेगळा आहे. तो सामान्य माणसांच्या नजरेतून लिहिलेला आहे आणि त्यात इतिहासात माणसाने केलेल्या पराक्रमाच्या कथा सांगण्याप्रमाणेच माणसाने केलेल्या घोडचुकाही दाखविल्या आहेत. या ग्रहावर प्रगत मानवप्राणी म्हणजेच होमो सेपीयन अवघ्या दोन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत उदयास आला आणि पुढं तो जगभर पसरला. या दोन लाख वर्षांच्या काळात त्यानं अवजारे कशी बनवली, त्याच्या टोळ्या कशा निर्माण झाल्या आणि बारा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लावल्यानंतर समाजातले काही लोक कायमचे गुलामीत कसे ढकलले गेले याचं अतिशय खेळकर शैलीतले वर्णन या पुस्तकात आहे. याशिवाय इतिहासातून आपण नेमके काय धडे घ्यायला हवे यासंदर्भातही उलटसुलट विवेचन केले आहे.
तर असे हे हरारी भेटतात. ते महत्त्वाचे का वाटतात तर तरु णाई 1999 साली जितकी इन्स्टंट सुखाच्या मागे होती त्यापेक्षा आज कितीतरी जास्त पटीनं सुखाच्या शोधात आहे. याच्या समांतर काळात तंत्नज्ञानात लागणारे निरनिराळे शोध आणि ऑटोमेशनमुळे भविष्यातले रोजगार कमी होणार आहेत. काही देशांची अर्थव्यवस्था प्रगती करीत असल्या तरी ही प्रगती बरीचशी स्वयंचलित यंत्राच्या साह्याने होत असल्याने त्यातून रोजगार निर्मिती होत नाहीये. सध्या रोजगाराच्या संधी शोधणा-याना तात्पुरते रोजगार मिळत असले तरी ते दीर्घकाळ टिकून राहातील याची कुठलीही शाश्वती नाहीये. आणखी पंचवीस वर्षांनी हे जग नेमकं कसं असेल याचा नेमका अंदाज कुणाकडेही नसल्यानं नेमके कुठले विषय शिकवावे वा त्यांना कुठले ज्ञान द्यावे याची पूर्वतयारी शाळा, कॉलेजेस वा विद्यापीठांनी अद्याप सुरू केलेली नाही. आपल्या भोवतालचे वातावरण वेगानं बदलत असून, ते अधिकाधिक अनिश्चित होत चाललं आहे. भारतातल्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 1 टक्के लोकांकडे भारताच्या एकूण पैशांपैकी 73 टक्के पैसा आहे. या आर्थिक विषमतेला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास काही लोक अमर होण्याच्या प्रयत्नात असून, उरलेल्या बहुसंख्यांच्या आयुष्यात आता नेमकं काय वाढून ठेवलं आहे, याबद्दल कुठलीही कल्पना नाही.
प्रश्न अनेक आहेत आणि ते थेट तुमच्या-आमच्याशी संबंधित असल्यानं ते सोडवण्यासाठी प्रयत्नदेखील आपल्यालाच करावे लागणार आहे. पण हे प्रश्न सोडविण्याआगोदर महत्त्वाचे आहे ते म्हणजे माणूस असणं म्हणजे नेमके काय? ते जाणून घेणं गरजेचं आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण माणसाचा सबंध इतिहास वाचू. सभोवतालची परिस्थिती तुम्हाला संभ्रमात टाकत असेल आणि नैराश्याने भरलेल्या या वातावरणात आता आपलं किंवा एकूण जगाचेच काय होणार आहे, हा प्रश्न तुम्हाला पडत असला तर तुमचा मेंदू अजूनही व्यवस्थित विचार करतो आहे. अशावेळी तुम्हाला युवाल नोहा हरारी यांची पुस्तकं मदतीला येतात.ते याकाळात महत्त्वाचे ठरतात, ते याचसाठी!