मित्र नक्की कुणाला म्हणावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 07:20 PM2019-08-01T19:20:59+5:302019-08-01T19:25:27+5:30

साडेतीन हजार ‘फेसबुक फ्रेण्ड्स; पण आजारी पडलं तर हॉस्पिटलमध्ये भेटायला कुणी येत नाही, स्टेट्स लाइक करणारे शंभरेक, दोनेकशे जण रडक्या इमोजी टाकून सांत्वनही करतील, तिनेकशे जण ‘गेट वेल सून’ अशा शुभेच्छा देतील; पण दवाखान्यात भेटायला कुणी येत नाही, आर्थिक मदत सोडाच, डबे कुणी पोहचवत नाही, मग हे कसले मित्र? आणि असे काही हजार मित्र असून उपयोग तरी काय?

Who exactly should a friend say? | मित्र नक्की कुणाला म्हणावे?

मित्र नक्की कुणाला म्हणावे?

Next

-  जयंत टिळक

आपण. तुम्ही आम्ही ‘मित्र’ हे बिरुद किती सहजपणे, कुणालाही लावून मोकळे होतो. एखाद्याला/एखादीला सहाध्यायी, सहकारी, सहप्रवासी, सहकलाकार असं जड शब्दात संबोधण्याऐवजी झटक्यात त्यांना मित्र संबोधून मोकळे होतो. पण खरंच ते आपले मित्न असतात का? मित्नत्वाची व्याख्या काय? मित्रत्वाचे निकष कोणते? मित्रत्वाच्या कसोट्या कोणत्या? या सगळ्या कसोट्या, निकष आणि व्याख्येमध्ये आपण एकेका मित्राला पडताळून पाहू लागलो तर त्यातले जवळपास सगळेच बाद होतील.

मग जगात कुणीच कुणाचे मित्र नाही का?

तुम्हाला किती मित्र  आहेत? अहं. मी तुमच्या फेसबुकवरच्या (तोंडदेखल्या) मित्रांबद्दल विचारत नाही, ख-याखु-या मित्रांबद्दल सांगा आणि तुमची ख-या मैत्रीची व्याख्याही सांगा. मला माहित्येय, कुणीही एवढं खोलात जात नाही त्यापेक्षा मित्न म्हणून मोकळं होणं सोपं असतं. खरं म्हणजे कुणीच जाणीवपूर्वक मित्रनिवडत नाहीत. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते आपोआप होत जातात.
आपण अनेकांना आपले मित्र मानत असतो. त्यांच्याकडूनही मित्रत्वाची अपेक्षा करीत असतो. पण वेळ येते तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण जरी त्यांना मित्रमानत असलो तरी त्यांनी आपल्याला कधीच मित्र मानलेलं नव्हतं/नसावं. अर्थात हे आपल्या बाबतीतही असू शकतं.
तुम्ही ती दोन मित्रांची गोष्ट वाचलीय? 
बोटीतून प्रवास करणारे दोन मित्र बोट बुडल्याने पोहत पोहत दोन वेगवेगळ्या बेटावर येऊन धडकतात. आपण त्यांना अजय आणि विजय म्हणू. सुटकेसाठी, मदत मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. दोघेही देवाची प्रार्थनाही करीत असतात. दिवसांमागून दिवस जातात. एक दिवस त्यापैकी विजय असलेल्या बेटावर एक बोट येऊन थांबते व विजयला घेऊन जायला निघते. आनंदलेला विजय ‘अखेर देवाने प्रार्थना ऐकली तर.‘असे मनात म्हणत बोटीवर चढतो. निघताना देवदूत विजयला विचारतो, ‘तुला तुझ्या मित्राला घेऊन जायचं नाही का? विजय म्हणाला, ‘माझ्या प्रार्थनेमुळे देवाने माझ्यासाठी ही बोट पाठवलीय, अजयने मनापासून प्रार्थना केलेली दिसत नाही !’ तेव्हा देवदूत रागावून म्हणाला, ‘मूर्खा, तुझ्यासाठी मित्राने - अजयने प्रार्थना केली होती म्हणून ही बोट देवाने पाठविली आहे. देव स्वत:साठी मागणा-याना काही देत नसतो, लक्षात ठेव !’
इथे अजयने विजयला मित्र मानलं होतं; पण विजयने.?
फार थोड्यांना ‘मित्र’ या व्याख्येत बसणारे मित्र लाभतात. खरं तर एखादाच मित्र पुरेसा असतो; पण तो ‘खराखुरा मित्र’ हवा ! मित्राची व्याख्या काय? शाळा-कॉलेजमध्ये एकाच वर्गात असतात, शाळेत एकत्नपणेच जा-ये करतात, एकाच बेंचवर बसतात, एकत्न अभ्यासही करतात ते सगळेच एकमेकांचे मित्र असतात का?
एकाच कार्यालयात वर्षानुवर्षे शेजारच्या टेबलवर बसून काम करतात, एकत्र कॅन्टीनमध्ये जातात, कधी सहकुटुंब एकत्रितपणे पिकनिकलाही जातात ते एकमेकांचे मित्र असतात का? 
एखाद्या क्लबमध्ये एकत्र पत्ते खेळतात, जिमखान्यामध्ये एकत्र  टेनिस वा बॅडमिंटन खेळतात, एकत्न दारू पितात, एकच सिगरेट शेअर करतात ते एकमेकांचे मित्र असतात का?
एकाच ट्रेनने अंधेरी-चर्चगेट वा पुणे-सीएसटी रोज प्रवास करणारे एकमेकांचे मित्न असतात का? 
एकाच शैक्षणिक/सामाजिक/सांस्कृतिक संस्थेमध्ये/संघटनेमध्ये एकत्र काम करणारे एकमेकांचे मित्र असतात का?
वर्षानुवर्षे एकमेकांच्या घराजवळ, घरासमोर वा एकाच सोसायटीत राहणारे एकमेकांचे मित्र असतात का?
आजच्या इंटरनेटच्या जमान्यात, कधी न पाहिलेल्या ‘मित्र-मैत्रिणींशी’ तासन्तास चॅटिंग करणारे, व्हॉट्सअँप, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर ‘मित्न’ जमविणारे, आणि माझ्या फ्रेण्ड्स लिस्टमध्ये पाचशे, आठशे, दोन हजार फ्रेण्ड्स आहेत अशी शेखी मिरवणारे खरोखरच एकमेकांचे मित्र असतात का?
याचं उत्तर- असूही शकतात. पण नसूही शकतात.
मग मित्र कुणाला म्हणायचं?
मला वाटतं, सूर जुळणे म्हणजेच मैत्री! मित्र म्हणजे निरपेक्ष बुद्धीने देणं, न सांगताही दुस-याचं दु:ख जाणणं! ज्याला कसलाही आडपडदा न ठेवता आपल्या मनातलं दु:ख-दु:ख सांगता येतं तो खरा मित्र ! ज्याच्यापासून आपल्याला काहीही (म्हणजे अक्षरश: काहीही !) लपवावंसं वाटत नाही तो खरा मित्र ! जो आपल्या वैभवावर जळत नाही तो खरा मित्रा आपल्या आनंदाचा त्यालाही तितकाच आनंद होतो तो खरा मित्न! आपल्या उत्कर्षाने ज्याचा जळफळाट होत नाही, तो खरा मित्र ! आपल्या चुका तो आपल्याला समजावून सांगतो आणि ती चूक नव्हती याची खात्री  पटल्यावर सा-या जगाशी पंगा घेतो, तो खरा मित्र ! मैत्रीपुढे जो स्वार्थाचा विचार करीत नाही तो खरा मित्र ! राग येईल, वाईट वाटेल याची पर्वा न करता वेळप्रसंगी कानउघाडणी करतो तो मित्न ! आपल्या दु:खात वाटेकरी होतो, नुसती सहानुभूती न दाखविता आपले दु:ख दूर करण्यास मदत करतो, एखादी आपत्ती कोसळली तर त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वस्व ओतून मदत करतो, तो खरा मित्र ! स्वत:चा उत्कर्ष करताना मित्रालाही त्यात सहभागी करून घेतो तो मित्र ! चांगले मित्र तुम्हाला घडवितात, वाईट मित्र बिघडवितात. मुळात बिघडवणा-याना मित्र म्हणायचेच कशाला?

एखादी व्यक्ती निवर्तल्यावर त्याला स्मशानापर्यंत ‘सोबत’(?) करणारे मित्र  नव्हेत ! (त्यातले अर्धेअधिक तर केवळ उपचार म्हणून, कर्तव्य म्हणून आलेले असतात !) तुम्ही खूप आजारी पडलात, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये अँडमिट केलंय अशावेळी केवळ कर्तव्य म्हणून येऊन विचारपूस करतात तेही मित्र   नाहीत. ‘काही मदत लागली तर अवश्य सांगा हं !’ असं तोंडदेखलं म्हणणारेदेखील मित्र   नव्हेत. खरा मित्र   तो, जो कुठलाही गाजावाजा न करता काही रुपये (मग ते पाच हजार असतील वा पन्नास हजार) तुमच्या हातात कोंबून म्हणतो, ‘तूर्त हे एवढे ठेवून दे, आणखी लागले तर सांग. परत करायची घाई करू नकोस. परत नाही केलेस तरी चालतील !’
‘फेसबुक’वरच्या मैत्रीचा तो किस्सा तुम्ही नक्की (‘फेसबुक’वरच) वाचला असेल. साडेतीन हजार ‘फेसबुक फ्रेण्ड्स असणारा एक तरुण आजारी पडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अँडमिट झाला आहे. त्याने तशा आशयाचे ‘स्टेट्स अपडेट’ करून दोन दिवस झाले आहेत. त्याच्या या ‘स्टेट्स’ला शंभरेक जणांनी ‘लाइक’ केलंय, दोनेकशे जणांनी रडक्या इमोजी टाकून त्याचं सांत्वन केलंय, तिनेकशे जणांनी ‘गेट वेल सून’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वरित तीन हजार ‘फ्रेण्ड्स’नी त्याच्या हॉस्पिटलायझेशनची दखलसुद्धा घेतलेली नाही. प्रत्यक्ष त्याला भेटायला तर कुणीच आलं नाही. त्याच्या काळजीने दोन दिवस धावपळ करीत आहेत ते त्याचे आई-बाबा आणि धाकटी बहीण ज्यांच्यासाठी त्याला कधीच वेळ नव्हता.
अर्थात मैत्री ही दोन हातांनी वाजणारी टाळी आहे. यापैकी एक हात जरी आखडता असला तर टाळी वाजणार नाही. दोन्ही हात एकमेकांच्या मैत्रीसाठी उत्सुक हवेत. इथे वर्णन केलेला खराखुरा मित्र  तुम्हालाही लाभायला हवा असेल तर तुम्हीही याच प्रकारे लोकांशी वागलं पाहिजे, त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणींना धावून गेलं पाहिजे. त्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे-तेही नि:स्वार्थी, निरपेक्ष भावनेने. तुमची मैत्री म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी असू नये. चांगला मित्र होण्यासाठी आधी तुमच्याकडे संवेदनशील मन हवं, स्वत:इतकाच दुस-याचाही विचार करण्याची सवय, वृत्ती हवी.
येत्या रविवारच्या मित्र  -दिनी तुम्हा सर्वांना असाच सच्चा मित्र आणि मैत्री लाभो, म्हणून शुभेच्छा !

jayant.tilak@gmail.com

Web Title: Who exactly should a friend say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.