शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जगण्याला पायडल येतं तेव्हा

By admin | Updated: December 18, 2014 18:36 IST

दुष्काळाची रेषा भाळी गोंदलेल्या मराठवाड्यातल्या लहानशा गावातली रानाशेतातली काट्याविंचवाची, दगडधोंड्याची वाट सायकलवरून कापत केलेल्या एका ‘लाइव्ह’ प्रवासाची गोष्ट.

 

बदनापूर, राजेवाडी, जवसगाव, हलदोला.. 

महाराष्ट्राच्या नकाशात शोधू म्हटलं तर सापडूही नयेत अशा अडनिड्या गावांमधील शाळकरी पोरींच्या साध्यासुध्या जगण्यात गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: क्रांती घडलीये. एरवी शहरी (आधुनिक) पर्यावरणवादी जीवनशैलीपुरती र्मयादित होऊ पाहणारी सायकल या मुलींच्या आयुष्यात आली तीच उद्याच्या उजळ दिवसाची ग्वाही देत. मराठवाड्यातील तीस तालुक्यांसह ठाणे, विदर्भ, कोकण अशा भागातील दुर्गम खेडोपाडी शिकणार्‍या मुलींना मानव विकास मिशनतर्फे ४६, ६८५ सायकली भेट देण्यात आल्या आहेत.
अर्थात, शाळकरी मुलींना सायकली देण्याच्या बातम्या वर्तमानपत्रांना तशा काही नव्या नाहीत; मात्र ही सायकल जेव्हा एखाद्या ग्रामीण भागातील मुलीला मिळते तेव्हा खरंच काय बदलतं तिच्या आयुष्यात? हे शोधत त्यांच्या अनोख्या प्रवासाची कहाणी जाणून घेण्यासाठी मी जालना जिल्ह्यातल्या सेलगाव या महामार्गालगतच्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन पोचले. तिथल्या ५६८ मुलींना सायकली मिळाल्यात. शाळेत पाऊल टाकताच पहिल्यांदा एका रांगेत सुबक नेटकेपणाने लावलेल्या सायकलींनीच लक्ष वेधून घेतले. मधल्या सुटीत काही बोलक्या चिमण्या धीटपणे भोवती गोळा झाल्या.
 प्रश्न विचारायचाच अवकाश सांगू लागल्या, ‘स्वत:ची सायकल घेऊन शाळेला येणं हे माझं स्वप्न होतं. आता ते खरं झालंय !’ - दोन वेण्या घातलेली काळी सावळी चुणचुणीत निकिता सुंदर्डे आता नववीत आहे. वडील शेती करतात. व्हॉलीबॉल, लांब उडीत राज्यस्तरावरची पारितोषिके तिनं मिळवली आहेत. दहावीनंतर तिला स्पोर्ट्समध्येच करिअर करायचंय. ती म्हणते, ‘सायकलने मला जो धीटपणा दिला नं, त्याच्यामुळे आता एखादी गोष्ट मी वडिलांशीही स्पष्टपणे बोलून त्यांना समजावू शकते.’  गोरी, बोलक्या डोळ्यांची श्रद्धा मात्रे आणि दुर्गा मात्रे. त्यांनी मनातली एक सल बोलून दाखवली, ‘आमच्या वयाच्या बहुतेक मुलींची लग्न एव्हाना लावून दिली जातात. गावात असलेल्या सातवीपर्यंतच्या शाळेत मुली शिकतात. मग पुढे शाळा तालुक्याला किंवा लांबच्या ठिकाणी असते. तिथं पोरीला कसं पाठवणार म्हणून मग लगेच तिचं लग्न लावून दिलं जातं. त्यानंतर कसलं शिक्षण आणि कुठली नोकरी? आमचं आता असंच होईल का ही भीती सतत वाटायची. पण अचानक सायकल आली सोबतीला आणि दहावीनंतरचं शिक्षण घेता येईल याची खात्री वाटू लागली.’ 
शिकायचंच म्हणत, अक्षरांच्या ओढीनं या मुलींना घर ते शाळा अशी रोजची पायपीट असायची दोन ते पाच किलोमीटर. ही वाटही दुर्गम, रानाशेतातली, काट्याविंचवाची, दगडधोंड्याची. दुष्काळाची रेषा भाळी गोंदलेल्या मराठवाड्यात तर या वाटांवरची चुकार हिरवळही तशी दुर्मीळच. या वणवणीलाच प्राक्तन मानून लग्न होईपर्यंत आला दिवस घालवायचा शाळेत अशा समजूतदार मुकाटपणानं शिकणार्‍या या पोरींना अचानक आभाळाचा रस्ता गवसलाय.  इथं सायकलमुळे अक्षरश: बालविवाह थांबलेत, काय नाय तर उरकून टाका लग्न असं व्हायचं, ते एका सायकलच्या सोयीनं जरा लांबायला लागलंय. निकिता राजपूत राजेवाडी गावातून शाळेत येते. ती सांगते, ‘आमच्या गावात बहुसंख्य राजपुतांची घरं आहेत. आमच्या समाजात १५-२0 लाख रुपये हुंडा देऊन कमी वयातच मुलीचं लग्न लावलं जातं. मी मात्र शिकून स्वावलंबी बनणार. हुंडा पद्धतीला मी नकार देणार आहे.’ मनिषा बोरुडे म्हणते, ‘शाळेत येण्या-जाण्याच्या वाटेवर कसं व्हायचं पोरीचं असं म्हणत माझ्या आईला सतत काळजी असायची. आता ती मला हसत निरोप देते. आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जातो ना सायकलवर !’ 
शीतल सुंदर्डे आणि सुप्रिया गोलवाल लोकनृत्याच्या स्पर्धेत राज्यस्तरावर बक्षिसं मिळवून आल्यात. त्या म्हणतात, ‘सकाळी घरकाम करून पायी शाळेत येताना नेहमी उशीर व्हायचा. तास बुडायचा. शिकवणीही लावता यायची नाही. आता मात्र वेळ वाचतो अन् अभ्यासही खूप होतो. गावात आजवर बारावीच्या पुढे कुठलीच मुलगी शाळा शिकली नाही. आई म्हणते की मला जे भोगावं लागलं ते तुझ्या वाट्याला येऊ नये. आम्हाला गाववाल्यांना काहीतरी करून दाखवायचंय’ असं बरंच मनातलं, कळकळीचं या मुली सांगत राहतात. शाळा सुटली तशी आधीच येऊन थांबलेल्या एस.टी.त बसून काही मुली निघाल्या. सेलगावपासून दोन किलोमीटरवर असलेल्या राजेवाडीच्या मुली सायकलवर बसून घराकडे निघाल्या. मीही त्यांच्यासोबत निघाले. ही सगळी वाट शेतातून जाणारी. गेल्या वर्षी प्रधानमंत्री योजनेतून पक्की सडक झालीय. पण सगळी उंचसखल, वळणावळणाची वाट. 
सायकल चालवत मुली मनातलं बोलू लागल्या, ‘आम्ही तशा सहावी-सातवीत असतानाच भावाकडून सायकल शिकलो होतो. घरी सायकलसाठी हट्टही केला. पण कुणी दिली नाही. भावाकडे सायकल होती. पण पोरीच्या जातीला कशाला हवी म्हणाले सगळे. त्यात पोरीला एकटंदुकटं कोण पाठवणार घराबाहेर? पेपराबिपरात एका पोरीला कुणी त्रास दिल्याची बातमी वाचली की घरचे जास्तच घाबरायचे. काही वेडंवंगाळ कानावर आलं की घरचे, नातेवाईक पण म्हणायचे, ‘बास झालं शिक्षण, आता घरात बस.’ भांडायचं तरी किती. कधीकधी मनात यायचं, नको ती शाळा! पण आता आम्ही खंबीरपणे आई-वडिलांना समजावतो. सायकलकडे बोट दाखवत, आम्ही सगळ्या एकत्रच जाऊ, काही भीती नाही असं सांगतो. बर्‍याच जणी एकत्र जाताहेत म्हटल्यावर घरचे पण तयार होतात.’ मुली पटापट सांगत असतात. बोलता-बोलता सायकलींचा वेग कमी झाला, गाव आलं. वेशीवरच्या लहान मुलांसह चावडीवर बसलेली मोठी माणसंही या सायकलवारीकडे कौतुकानं पाहत होती. पोरी म्हणाल्या, ‘गावात पोरींनी सायकल चालवणं ही तशी अनोखीच गोष्ट होती. मात्र सायकलींची योजना आल्यावर गावातल्या वडीलधार्‍यांनी मनावर घेतलं. आम्ही शिकावं असं त्यांना वाटलं हेसुद्धा नवीनच होतं. गावचे सरपंच बाळासाहेब मात्रे, त्यांनी पुढाकार घेतला. घरोघरी वडील किंवा भाऊही म्हणाले की, तू शिक. त्यांनीच आमची बॅँकेत खाती उघडावीत म्हणून खूप मदत केली. खरंतर वावरात कामं असली की पोरींना कुणीच शाळेत पाठवत नाही. पण यंदा घरच्यांनी पण सांगितलं, शेतातलं आम्ही पाहू, तू जा शाळेत. सायकल बिघडली तर आता घरीच भाऊ ती रिपेअरपण करून देतात.’
या गप्पा रंगल्या अशा. पण शाळेतून आल्या म्हटल्यावर मुली भराभर पांगत  घरी पोचल्या. घरी पोचताच गायीचं वासरू बांधलेल्या खुंट्याशेजारीच सायकल लावत कामाला भिडल्या. त्यांचा तो उत्साह, ते भिरभिरत पटापट कामाला लागणं, त्यांची गोठय़ात लागलेली सायकल हे सारंच त्यांच्या शाळकरी जगण्यात अनोळखी वळणांसारखं आलं. आणि त्याही आता निसरड्या जागा टाळत, काटे-कुटे बाजूला सारत या अनवट वाटेला वहिवाट बनवू पाहताहेत. 
 
उत्साही यंत्रणेच्या कल्पनेला स्वप्नांचे पंख
लालफितीचा शासकीय कारभार टाळत ही सायकल योजना इतक्या पारदश्रीपणे प्रत्यक्षात आणण्यात मानव विकास आयुक्त भास्कर मुंडे आणि उपआयुक्त एस. के. दायमी यांनी पुढाकार घेतला. या योजनेमागचे हेतू सांगताना आयुक्त मुंडे ग्रामीण पर्यावरणाकडे लक्ष वेधतात, ‘अस्वस्थ करणार्‍या वर्तमानाच्या धास्तीने पालक मुलींची लग्नं लवकर लावून जबाबदारीतून मोकळं होण्याचा प्रयत्न करतात. पण अवेळी झालेल्या विवाहामुळे मुलींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. हे सगळं लक्षात घेऊन मुलींच्या शिक्षणाची गळती रोखण्यासाठी आम्ही मानव विकास मिशनतर्फे मुलींसाठी मोफत एस. टी.ची सोय केली. या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र जी गावं दुर्गम आहेत, एस.टी.च्या मार्गावर नाहीत त्यांचं काय, हा प्रश्न समोर आलाच. गेल्यावर्षी जूनमध्ये सायकलींचा प्रयोग केला. पारंपरिक शासकीय पद्धतीने काम न करता  सायकलसाठी पात्र मुलींची यादी बनवून, मुलींना कागदपत्रं जमवायला सांगून, बॅँकेत अकाउंट उघडून देण्यासाठीही पाठपुरावा केला. सायकलसाठीची रक्कम थेट मुलींच्या बॅँक खात्यात जमा केली.  योजना इतकी प्रभावीपणे साकारली की आजवर एकही तक्रार आली नाही. सेलगावच्या शाळेचे मुख्याध्यापक संजय भुजंग, केंद्रप्रमुख शशिकला केतकर, शिक्षणविस्तार अधिकारी विनया वडजे आणि गटशिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनीही मुलींपर्यंत या सायकली पोहचाव्यात आणि मुली सायकलवर शाळेत याव्यात म्हणून खूप प्रयत्न केले. 
 
- शर्मिष्ठा भोसले