शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

गावाकडल्या पोरी पडल्याच प्रेमात तर काय होतं?

By admin | Updated: February 5, 2015 19:12 IST

तो हिंदी विषयात पी. एचडी करणारा. हुशार, समंजस आणि वाचनवेडा. दोघांचा विविध विषयांवर सातत्याने संवाद व्हायचा, प्रसंगी वादही व्हायचे, अर्थात वैचारिक! मैत्रिणीचा मोठा भाऊ या मैत्रीकडे कौतुकाने पहायचा

 स्नेहा पाटोळे , (‘राईट टू लव्ह’ रॅलीत सहभागी झालेली तरुणी) - 

 
अकरावीत माझी एक मैत्रीण होती. विचारी, कवीमनाची, उत्तम वाचन-जाण असणारी. एका छोट्या खेड्यात शाळा शिकून महाविद्यालयीन शिक्षणासाठी आमच्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी आलेली. एका खोलीत काही वर्गमैत्रिणींसोबत राहायची. तिच्याच गल्लीत राहणार्‍या एका मुलासोबत तिची मैत्री झाली. तो हिंदी विषयात पी. एचडी करणारा. हुशार, समंजस आणि वाचनवेडा. दोघांचा विविध विषयांवर सातत्याने संवाद व्हायचा, प्रसंगी वादही व्हायचे, अर्थात वैचारिक! मैत्रिणीचा मोठा भाऊ या मैत्रीकडे कौतुकाने पहायचा. कालांतराने मात्र या दोघांच्या नात्यात फुललेलं प्रेम तिच्या भावाला कमालीचं खटकलं. भावानं तिला समजावून पाहिले. ती ऐकेना तेव्हा त्यानं ‘त्या’ मुलाला तिला जबरदस्तीनं चारचौघात राखी बांधायला लावली. 
झाला तेवढा तमाशा पुरे म्हणत पुढं दोघंही वेगळ्या वाटांनी निघून गेले. विशेष गोष्ट अशी की, या मैत्रिणीच्या भावाने नंतर काही दिवसांनी गावातल्याच एका मुलीशी घरच्यांचा विरोध पत्करुन प्रेमविवाह केला. तो अर्धशिक्षित, वाहनचालक म्हणून काम करणारा, तिने डी.एड केलेलं. तिची शिक्षिका होण्याची महत्त्वकांक्षा मारुन त्यानं तिला निमुट संसार करायला भाग पाडलं. माझी मैत्रिणही आता शिक्षिका होऊन घरच्यांनी निवडलेल्या मुलाशी मुकाटपणे संसार करते आहे.  
या चित्राकडे आज मी त्रयस्थपणे पाहते तेव्हा त्यावेळी न जाणवलेल्या काही गोष्टी ठळकपणे जाणवतात. मैत्रीण स्वतंत्र विचारांची होती तरीही तिनं आई-वडिलांशी बोलून भावाला समजावण्यासाठी काही पाऊल का उचललं नाही? अर्धशिक्षित, अविचारी भावाला स्वत:च्या आयुष्यात इतका हतक्षेप करण्याचा अधिकार का दिला? करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य तिनं मिळवलं, तसं जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य का नाही? स्वत: प्रेमविवाह करणारा भाऊ बहिणीची प्रेमभावना का समजावून घेऊ शकला नाही? 
गावाकडे आजही अनेकींच्या मनात उमलणारी तारुण्यसुलभ कोवळीक काही काळात करपून जाते हे कितीही नाकारलं तरी वास्तव आहे. या मुली जाणून असतात त्यांचं, त्यांच्या प्रेमाचं प्राक्तन. समोर येणार्‍या जगण्याचा समंजस स्वीकार म्हणजेच आयुष्य हे गृहीतक खूप आधीच त्या गोंदून घेतात उरीपोटी.  मात्र मनातले कढ कळत नकळत त्या खोलून दाखवतात जिव्हाळ्याच्या जागी. 
एकदा ‘त्या’ मैत्रिणीसोबत तिच्या गावी गेले होते. गावाला लागून वाहणार्‍या नदीवर धुणं घेऊन गेलो तेव्हा तिचा बांध फुटला. रडणं ओसरल्यावर बोलती झाली, ‘आबा (वडिल) गावच्या शाळेत शिक्षक होते. त्यांना थोरामोठ्यांमध्ये मान आहे. आमचं खानदान मोठं. नातेवाईकांचा विरोध सोसून मला तालुक्याला शिकायला पाठवलं. मी शिकून कितीही कमावती झाले, नोकरी मिळवली तरी जातीबाहेर, स्वत:च्या मर्जीनं लग्न करणं घरच्यांना सहन होणार नाही. वडिलांना गावात बोल लागणार. पोरीला शिकवून चूक केली असंच सगळे म्हणणार. म्हणून मी पाऊल मागे घेतले.’ 
जवळच्याच एका गावातून शहरात शिकायला येणार्‍या आणखी एका मैत्रिणीचंही शिक्षण एकदिवस अचानक थांबवण्यात आले. कारण एका मुलाशी तिचं नाव जोडून कुणीतरी ते गावापासून शहरात येणार्‍या रस्त्यावर,आजूबाजूच्या दगडांवर  लिहून ठेवलं होतं. वर्गातल्याच एका मुलासोबत तिचं नाव लिहिलं गेल्याची चर्चा गावभर झाली. तिच्या चुलत्यांनी वडिलांना भरीस घालत हा तिचं शिक्षण बंद करून तिला घरीच बसवण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडलं.
हे सारं चालू असताना दुसरीकडं असंही दिसतं की, एरव्ही गावातली तरुण मुलं एकमेकांना प्रेमप्रकरणांमध्ये जीवापाड मदत करतात, प्रसंगी जीव धोक्यात घालून आपण  कसा एका मित्राचा प्रेमविवाह लावून दिला हे इतरांना फुशारक्या मारत रंगवून सांगतात. पण गोष्ट जेव्हा त्यांच्या सख्ख्या वा अगदी चुलत बहिणीची किंवा अगदी जवळच्या नात्यातल्या मुलीची येते तेव्हा लगेच ही तरुण मुलं, त्यांचाही नकळत ‘पुरुषी’ पवित्रा घेत पझेसिव्ह बनतात. आमच्या जातीतल्या, नात्यातल्या स्त्रियांनी कसं वागावं ते आम्ही ठरवू असा तो पवित्रा असतो. 
आणि जिथं धाकदमदाटी चालत नाही तिथं आई वा वडिल शेतातलंच कीटकनाशक घेऊन जीव देण्याची धमकी देतात. कायम कुटुंबकेंद्री आणि सर्मपित वृत्तीसाठी गौरवलेल्या मुली मग सहज शरणागती पत्करतात. मुलीने सहजीवनाबाबत थोडा जरी स्वतंत्र विचार केला तरी तिच्या शिक्षणाला दोष दिला जातो. तुला आम्ही एवढं शिकवलं ते याचसाठी का? हे तिला ऐकवलं जातं. तू आम्हाला अनुकूल वागलीस तरच आमची असा सगळा अविर्भाव असतो.
 कुटुंबाचा सामाजिक चेहरा आणि जातीची खोटी प्रतिष्ठा जपण्याचे सगळे जोखड देहमनावर वागवत या मुली वावरत असतात. आणि अनेकींच्या आठवणीत अकाली मेलेली स्वप्नं पक्की कोरलेली असतात.  एखाद्या समवयीन मुलाविषयी आपल्याला प्रेम वाटतं हे सत्य त्यांना (प्रेमाच्याही आधी) अपराधभाव देतं. 
मग त्या संभ्रमात पडतात, स्वत:लाच प्रश्न विचारतात, स्वत:चीच उत्तरं शोधतात. कधी चूक तर कधी बरोबर. तशातही काही बंडखोर मुली हे जोखड झुगारुन मागू पाहतात स्वत:ची जमीन आणि स्वत:चं आभाळ. त्याची किंमत त्या मोजतात, धडपडतात, सावरतात, बिकटवाटेला वहिवाट बनवतात!
पण अशा थोड्याच.
बाकीच्यांच्या मनात मात्र कधीकाळी कुणाविषयी तरी वाटलेल्या प्रेमाच्या, कुणीतरी आवडल्याच्या फक्त आठवणी असतात.
------------------------------
शर्मिष्ठा भोसले - 
 
 ‘‘नुसतं हळहळ व्यक्त करु न काय होणार, प्रेमाला विरोध करुन दडपशाही करणार्‍यांचा जाहीर विरोध आणि निषेध केला पाहिजे असं आम्हाला वाटलं. ही निषेध रॅली पुण्याच्या गुडलक चौकातूनच झाली पाहिजे असे आम्ही ठरवल. कारण पुण्यातील गुडलक चौक म्हणजे चळवळी आणि आदोलनाचं ‘तहरीर स्क्वेअर’. या रॅलीनं निदान महाराष्ट्रात या प्रश्नाची चर्चा तरी सुरू झाली. गेल्या शुक्रवारी पुण्यात याच विषयावर ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी तरु णांची चर्चा घडवून आणली. विषयाला निदान तोंड फुटलं.’’
------------------
अभिजित कांबळे , संयोजक, राईट टू लव्ह रॅली - 
 
ग्रामीण भागात जगणं,
गुन्हा आहे का?
‘‘पुण्याजवळच्या एका लहानशा गावात मी वाढले. पुण्यात उच्चशिक्षणासाठी आल्यावर जाणवत्लं की की ग्रामीण भागात प्रेमविवाहांना, प्रेमात पडायलाच जेवढा विरोध होतो, तेवढा शहरात होत नाही. गावात मात्र सगळ्यात आधी मुलीलाच आरोपीच्या पिंर्जयात उभं केलं जातं. माझ्या गावात एका जोडप्यानं समाजाच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन लग्न केलं. संसार सुरू केला पण मुलाच्या नातेवाईकांनी त्याचं इतकं मानसिक खच्चीकरण केलं की, एकदिवस त्यानं त्या मुलीला तिच्या घरच्यांकडे परत नेऊन सोडलं. यासार्‍यात त्या मुलीचं मानसिक संतूलनच बिघडलं. जातीपातीपुढं आजही गावात व्यक्तिगत भावना शून्य ठरतात. एका मुलीच्या आयुष्यापेक्षा जात आणि समाज हे जास्त वरचढ ठरतात. 
हे सारं आपल्याच देशात घडतंय, आपल्याच शहराजवळच्या गावात घडतंय, हे शहरी तारुण्यानं समजून घ्यावं. हा प्रश्न ग्रामीण तारुण्याचा, त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं म्हणून कुणी हात झटकू नयेत.’’