- आयुब मुल्ला
दिव्यांगत्वाला कवटाळत बसलो नाही. जिद्दी मनाला दिव्यांगत्व नसतं, हे मी जाणलं होतं. त्यामुळे प्रचंड जिद्दीने अभ्यास केला. कोणताही क्लास लावला नाही. मराठी माध्यमातून परीक्षा दिली. अन् मी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो..
हे मनोगत ऐकताच सभामंडपातील दहा हजार उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. हे मनोगत होतं बीड येथील जयंत किशोर मंकले नावाच्या तरुणाचं. यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यातील 34 जणांचा गौरव कोल्हापूर येथील वारणानगर येथे सुराज्य फाउण्डेशनतर्फे करण्यात आला. त्यावेळी जयंत भेटला.
तो सांगतो, मी लहान असताना वडिलांचं निधन झालं. आई, दोन बहिणी, एक भाऊ यांनी मला पाठबळ दिले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी डिस्टिंगशनसह मिळाली. त्यानंतर मात्र माझ्या डोळ्यांना अंधत्वाच्या आजारानं घेरण्यास सुरुवात केली. दृष्टी हळूहळू कमी होत गेली. नोकरीची तर गरज होती. मुंबई महापालिकेत शिपाई पदासाठी दिलेली परीक्षा पास झालो. हजर होण्यासाठी गेलो; परंतु मनानं साथ दिली नाही. ऑफिस बाहेरची खुर्ची व आतील खुर्ची याची मनात तुलना केली. अन् ठरवलं आपल्यासाठी आतली खुर्ची हवी. यूपीएससी करण्याचा निर्धार केला. परंतु एकीकडे दृष्टी कमी होत चाललेली अन् दुसरीकडे व्यापक अभ्यासाची हूरहूर होती. पण डगमगलो नाही. ऐकण्यावर भर दिला. कोणताही क्लास न लावला अभ्यास केला. मराठी माध्यमातून परीक्षा दिली. पास झालो. 75 टक्के अंध असताना प्रयत्नांती यश मिळालं. दिव्यांगत्व शरीराला असतं, मनाला, जिद्दीला नसतं. जिद्दीने सामोरं जा जे ठरवलं ते जमतंच.**
याच कार्यक्रमासाठी आलेला गणेश टेंगले. जत तालुक्यातील दरीबीडची या दुष्काळग्रस्त भागातला गणेश. त्याचे आईवडील ऊसतोडणी मजूर. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं. शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. मेकॅनिकल इंजिनिअर चांगल्या गुणांनी पास झाला. यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. सुरुवातील अपयश आलं. पण त्यानं अपयशाचा स्वीकार केला; पण प्रयत्न सोडले नाहीत. अखेर आयएएस झालाच.**
औरंगाबादची डॉ. मोनिका घुगे. तिनं एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी घेतली. ती सांगते, औरंगाबाद हॉस्पिटलमध्ये माझी एण्टर्नशिप सुरू होती. तेव्हा एक माता आपल्या लहान बालकाला घेऊन रुग्णालयात आली. ते बालक कुपोषित. थोडं बरं वाटलं, घरी गेलं. पुन्हा ती आई त्या बाळाला घेऊन आली. मी विचारलं, तुम्ही परत परत दाखवायला का येता? योग्य आहार, औषधं घेत नाही का? तेव्हा ती महिला म्हणाली, अहो, तुम्हाला बोलायला काय जातं, माझा नवरा दारूडा हाय! माझ्या कमाईवर प्रपंच चालतो, गरिबी तुमाला कळणार नाय! तेव्हाच माझा निश्चय बदलला. सरकारला दोष देणं योग्य नाही. सरकारच्या व्यवस्थेत जाणं गरजेचं आहे. यासाठी मी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. प्रारंभी मला अपयश आलं. नाराज झाले. तेव्हा आईने मला सल्ला दिला. परीक्षा देणारी वंजारी समाजातील तू पहिली मुलगी आहेस, तू यामध्ये हरू नकोस, नाहीतर समाजातील पालक आपल्या मुलींना या क्षेत्राचा अभ्यास कर असं म्हणायचं धाडस करणार नाहीत. मी अभ्यासात सातत्य ठेवले अन् आयएएस झाले. **
अनिल लक्ष्मणराव खडसे (रा. झाडगाव, जि. यवतमाळ) घरात शैक्षणिक वारसा नसताना त्यानं यूपीएससी करून दाखवलं. तो सांगतो, गावाकडे बॅण्डबाजा व्यवसाय जास्त. सन 2011 मध्ये बाळू बॅण्डबाजा हा चित्रपट आला, तो पाहिला. त्यानंतर मीसुद्धा गावात बॅण्डमध्ये छुनछुने वाजविण्याचं काम केलं. पण हे करीत असताना शिक्षणावरच प्रेम कधीही कमी होऊ दिलं नाही. वडील बॅण्ड वाजवायचं आणि झाडू बांधायचं कामही करायचे. त्यांना झाडू बांधण्यासही मी मदत करायचो. आई दायीचं काम करते. अशा परिस्थितीतून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. इंजिनिअर झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. या सत्काराने अधिकारी पदाचा दर्जा मला समजला. माझ्या मनात विचार आला, आपणही असं बनूया. आईवडिलांना तो विचार बोलून दाखवला. त्यांनीही कलेक्टर होशील तर समाजाचं भलं करशील, असा सल्ला दिला. मी तयारीला लागलो. उत्तीर्ण झालो. आजही माझ्या अशिक्षित आईवडिलांना ही परीक्षा कशी असते याची साधी कल्पनासुद्धा नाही. पण त्यांनी मला शिक म्हणून सल्ला दिला. हा सल्ला प्रेरणादायी ठरला. छुनछुने वाजविणं ते यूपीएससी उत्तीर्ण हा प्रवास हे शिक्षणानं केलेलं परिवर्तन आहे.***
संदीप सूर्यवंशी (रा. मनपाडळे, जि. कोल्हापूर) तो सांगतो, वडील साखर कारखान्यात शेती मदतनीस होते. मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याची इच्छा मला स्वस्थ बसू देत नव्हती. आव्हानं पेलण्यासाठी रिस्क घेणं गरजेचं होतं कारण रिस्क घेतल्याशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे आयएएस झालो. व्यक्तिमत्त्व विकासाची ही परीक्षा पास झालो. एकरी शंभर टन ऊस काढणं हे यूपीएससीतील यशासारखंच आहे. त्यामुळे प्रगतिशील शेतकरीही महत्त्वाचा आहे. ***
निखिल निपाणीकर (बेळगाव) हा शाळा, कॉलेजमध्ये हुशार नव्हता. तो म्हणतो, मी दहा वर्षाचा होतो तेव्हा वडिलांचं छत्र हरपलं. शाळेत टॉपर नव्हतो. कसाबसा पास झालो. डिप्लोमाला (मेकॅनिकल) प्रवेश घेतला. तेव्हा शिक्षक म्हणाले, तू डिप्लोमा होणार नाहीस. पण मी तो पूर्ण केला. ज्या शिक्षकांनी डिप्लोमा करणार नाहीस, असा टोमणा मारला होता. त्यांच्याच हस्ते मला डिप्लोमानंतर ट्रॉफी देऊन गौरविण्यात आलं. त्यानंतर 19 लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली. ती सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात आयएएस झालो.
(‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये बातमीदार आहेत.)