आझाद गणेश मंडळ
यामंडळाची स्थापना होऊन ५0 वर्षांहून अधिक काळ तरी झाला. अहेरी राजनगरीतील आझाद गणेश मंडळाची ओळखच हिंदु-मुस्लीम एकतेची परंपरा अशी आहे. सर्वधर्मियांच्या सहभागातून गणेश उत्सव साजरा करीत आहे. गणेशोत्सवाच्या काळात हे मंडळ अनेक उपक्रम करतं. आदिवासी भागातील जनतेची आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर हे तर होतंच. पण याशिवायही पूर्ण वर्षभर अंध, अपंगांना आर्थिक मदतीचा हात देण्यासोबतच अनाथ बालकांना दत्तक घेऊन त्यांना जीवनावश्यक गोष्टी पुरविण्याचे काम या मंडळामार्फत केले जाते. चंद्रपूर येथील अनाथालयातील २0 बालकांना मंडळाच्या वतीने दत्तक घेण्यात आले. १६ अंधबालकांना काही साहित्यही मंडळानं दिलं. मिरकल या गावाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गणेशोत्सव मंडळाने मोठी कामगिरी बजाविली आहे. अहेरी उपविभागातील अनेक खेड्यांतील अपंगांचा शोध घेऊन त्यांना तीनचाकी सायकलीचे वाटप मंडळामार्फत दरवर्षी केले जाते.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार मंडळामार्फत केला जातो. मंडळाचे दरवर्षीचे देखावे हे समाजप्रबोधनपरच असतात.
नक्षलग्रस्त भागातल्या माणसांना उमेद देण्याचं कामच हे मंडळ करतंय.
- प्रतीक मुधोळकर