एक तेरा चौदा वर्षांचा तरुण.काहीसा रागट. तापट.विनाकारण चिडका. शेजारच्यांशी तर छत्तीसचा आकडा. शेजारच्यांना वाटे, हा मुलगा उद्धट, वाया गेलेलाच आहे..त्याच्या आईवर मात्र त्याचा भारी जीव. आई म्हणेल ते तो मुकाट करायचा..एकदा शेजारचे काका घरी आले आणि त्याच्या आईला म्हणाले, ‘ तुमचा मुलगा पलिकडच्या टपरीवर सिगरेट फुंकत होता, वेळीच त्याला आवरा, नाहीतर कार्ट वाया जाईल..’मुलगा हे ऐकत होता..त्याला माहिती होतं, आता आपली खैर नाही.मात्र त्याची आई शांतपणे त्या शेजारच्यांना म्हणाली, ‘ एकतर तुम्ही त्या टपरीवर कशासाठी गेला होतात हे मी विचारणार नाही, बाकी माझा मुलगा सूज्ञ आहे, तो जे करेल ते योग्यच, पुन्हा त्याचं गाऱ्हाणं घेऊन माझ्याकडे येऊ नका..’-हे ऐकून तो मुलगा ढसढसा रडत आईच्या पायाशी येऊन बसला. चुकलो म्हणाला. पुन्हा असं करणार नाही..आई एकच वाक्य म्हणाली, ‘ तू चुकीचं वागणार नाही हा माझा विश्वास, तो मी बदलणार नाही, तो राखायचा की तोडायचा तुझं तू बघ.. मी आहेच सोबत, तू कसाही असला, वागला तरीही..’पुन्हा काही तो मुलगा त्या टपरीच्या दिशेनं गेला नाही.. कधीच!- ऊर्जा
मन की बात
By admin | Updated: June 19, 2016 07:46 IST