शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

टामटूम आयटी इंजिनिअर? जॉब विसरा!

By admin | Published: June 22, 2017 8:56 AM

सध्या वर्तमानपत्र उघडले की आयटी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अशा बातम्या दिसतात. अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसाचे नियम कडक केले असल्याने भारतीय आयटी प्रोफेशनल्सच्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरडसुद्धा दिसते

-  चिन्मय गवाणकर 

सध्या वर्तमानपत्र उघडले की आयटी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अशा बातम्या दिसतात. अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसाचे नियम कडक केले असल्याने भारतीय आयटी प्रोफेशनल्सच्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरडसुद्धा दिसते. या दोन्ही मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे. पण यासाठी सरसकट आयटी कंपन्यांना किंवा अमेरिकन सरकारला व्हिलन बनविण्याआधी काही बाबींचा सर्वांगीण परामर्श घेणे गरजेचे आहे. आपल्या आयटी क्षेत्राबद्दलच्या काही भाबड्या कल्पना आणि समज तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे. ‘भारतीय संगणक अभियंते जगभर भारताचा झेंडा फडकवीत आहेत आणि भारत आयटी क्षेत्रात महासत्ता आहे,’ असा एक भाबडा समज आपल्या देशात आहे. रोजगार निर्मितीसाठी दुसरे काही ठोस जमत नसल्याने या दिवास्वप्नात जनतेला मग्न ठेवणे हे बेरकी राजकारण्यांच्या सोयीचेसुद्धा आहे. प्रत्यक्षात ९९ टक्के भारतीय आयटी कंपन्या या केवळ परदेशातील आयटी प्रकल्पांसाठी स्वस्त मनुष्यबळ पुरविण्याचे ठेकेदार आहेत. १९९० च्या दशकात भारतात जरी फारसे संगणकीकरण झाले नव्हते, तरी परदेशातील संगणकावर अवलंबून असणाऱ्या हजारो उद्योगांनी वायटूकेच्या भीतीने आपली दारे ‘जो मिळेल तो’ या तत्त्वावर (भारतासारख्या स्वस्त मनुष्यबळ देणाऱ्या, इंग्रजी बऱ्यापैकी माहीत असलेल्या देशांसाठी) उघडली आणि आपल्याकडे ज्याला- ज्याला कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान होते त्यांना जराशा प्रशिक्षणाने परदेशी जायची संधी मिळू लागली. डॉलरमध्ये पगार आणि परदेशी नोकरी याचे टिपिकल मध्यमवर्गीय आकर्षण यामुळे आयटीबद्दल एक प्रकारचे वलय निर्माण झाले. जो तो आयटी /कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये येण्यासाठी पळू लागला. मुळात या सर्व प्रकारात ‘इंजिनिअरिंग’ काहीच नव्हते. आवश्यक होते ते कोडिंगचे ज्ञान. आणि कोडिंग तर कोणीही शिकू शकतो. आजही काही सन्माननीय अपवाद वगळता कॉम्प्युटर/माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मूलभूत संशोधन अथवा एखादे नवीनतम (इनोव्हेटिव्ह) उत्पादन याबाबतीत भारतीय लोकांची आणि कंपन्यांची बोंबच दिसते. केवळ मायक्र ोसॉफ्ट, गुगल अशा कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय मुळाची व्यक्ती (सत्या नाडेला/सुंदर पिचाई) बसल्याने या वास्तवात तसूभरही फरक पडला नाहीये आणि नजीकच्या काळात पडण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.याउलट जगातील आज सर्व आघाडीच्या आयटी प्रणाली/उत्पादने ही अमेरिकन (उदा : अ‍ॅपल/मायक्र ोसॉफ्ट/ओरॅकल इ.) अथवा युरोपियन (उदा : एसएपी) कंपन्यांनी बनवलेली दिसतात. या कंपन्यांची उत्पादने/प्रणाली स्वस्तात ‘बसवून’ द्यायचे काम आमचे आयटी ‘कामगार’ करतात. म्हणजे हा ‘लेबर जॉब’ झाला. इतिहास साक्षी आहे की असे लेबर/कामगार जॉब्ज स्वस्ताईकडून अधिक स्वस्ताईकडे आणि मग यांत्रिकीकरणाकडे (आॅटोमेशन) जातात. भारताच्या ३००० अभियांत्रिकी विद्यालयांमधून सुमारे १५ लाख इंजिनिअर्स बाहेर पडतात दरवर्षी आणि यातील ३० टक्के मुलांना जेमतेम आज नोकरी (मग ती इंजिनिअरची असेलच असे नाही) मिळते, याचे कारण हेच ! पूर्वी लहानपणी एक गमतीचे कोडे ऐकले होते.. राजा का आजारी पडला?, घोडा का बसला? आणि भाकरी का करपली? या सगळ्याचे उत्तर होते एकच : ‘न फिरल्याने/फिरविल्याने’!

इंजिनिअर बेकार का झाले? अभियांत्रिकी महाविद्यालये गोत्यात का आली? आणि भारतीय आयटीचा फुगा का फुटला?या सर्व प्रश्नांचे उत्तरसुद्धा एकच- ‘नवीन शिकण्याची क्षमता आणि कौशल्य आत्मसात न केल्याने’ !हे सारे नेमके काय होतेय?आयटीचं सत्य नेमकं काय? आणि आपण मृगजळाच्या मागे धावतोय का?

 

"आयटी"चा फुगा का फुटला

इंजिनिअर झालं की थेट बडी आयटी कंपनी. की लगेच आॅनसाइट मिळणारा ‘इझी डॉलर मनी’ आणि इकडे देशात त्याचवेळी दणक्यात मिळणारा भारतीय रुपयांमधला पगार या गोष्टी यापुढे अस्तित्वात राहणार नाहीत. थातूरमातूर खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पाट्या टाकून इंजिनिअर झालेल्यामुलांना नोकरी मिळणं तर सोडाच, कुणी साधं इंटरव्ह्यूलासुद्धा बोलावणार नाही. तरीही तुम्हाला इंजिनिअर व्हायचंच असेल तर..?

संगणक प्रशिक्षित भारतीय मनुष्यबळ स्वस्त असल्यानं गेली दोन दशके आपले आयटी ‘कामगार’ परदेशी लोकांना स्थानिकांपेक्षा सहज ‘परवडायचे’. आपल्याकडे मुंबईला जसे बिहार आणि यूपीमधले मजूर बांधकाम क्षेत्रात परवडतात तसे. पण हा काळ आपल्या देशाने फक्त ‘आयटी महासत्ता’ म्हणून खोटी कौतुके करून घेण्यात फुकट घालवला. मागणी तसा पुरवठा म्हणून भारंभार इंजिनिअरिंग कॉलेजं निघाली आणि लाखो ‘अभियंते’ (!) या फॅक्टरीजमधून बाहेर पडू लागले. जोपर्यंत आयटी प्रोजेक्ट्स सुरू होते आणि मनुष्यबळ गरजेचे होते तोपर्यंत हा फुगा फुटला नाही. पण गेली पाच वर्षे हा या क्षेत्राचा संक्र मणाचा काळ ठरला. पहिला फटका : तंत्रज्ञान बदलले मशीन लर्निंग, इंटरनेट आॅफ थिंग्स, आभासी बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटिलिजन्स), बिग डेटा अ‍ॅनालिटिक्सचे ‘सेल्फ सर्व्हिस’ प्लॅटफॉर्म्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग इत्यादी नवीन गोष्टींनी तंत्रज्ञानाचे विश्व बदलून टाकले. आभासी बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्सने आयटीमधले लो लेव्हल् /रिपिटेटिव्ह म्हणजे टेस्टिंग/डिबगिंग/सिम्पल प्रोग्रामिंग/सिम्पल कोड चेंजेस असे रोजगार संपवले. बिग डेटा आणि अ‍ॅनालिटिक्सचे प्लॅटफॉर्म्स आता अधिकाधिक सोपे होत असल्याने बिझनेस युजर्स ते स्वत: सेल्फ सर्व्हिस करून वापरू शकतात. त्याने ‘अनॅलिस्ट’चे जॉब्स कमी केले. म्हणजे पहिले एक्सेल शीट्सच्या डोंगराखाली जे काम दहा लोकांची टीम एक आठवडा करायची आणि बिझनेस लीडर्सना समजेल असे रिपोर्ट्स आणि चार्ट्स तयार करून द्यायची, तेच काम आता स्वत: बिझनेस युजर्स स्वत:च्या आय पॅडवर पाच मिनिटांत करू शकतात. म्हणजे जरी बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स, डेटा सायन्स हे आजही जरी ‘हॉट’ करिअर आॅप्शन्स असले, तरी त्या क्षेत्रातसुद्धा लो लेव्हल अथवा एंट्री लेव्हल नोकऱ्या कमी झाल्या आहेत.पूर्वी अजून एक क्षेत्र आयटीमध्ये भरपूर नोकऱ्या द्यायचे, ते म्हणजे ‘हार्डवेअर, नेटवर्क आणि सिस्टिम्स मॅनेजमेंट’. म्हणजे ज्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी मिळायची नाही त्यांना किमान हार्डवेअर मॅनेजमेण्ट अथवा नेटवर्क/डेटा सेंटर मॅनेजमेण्ट अशा नोकऱ्या मिळायच्या. आता क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे ते रोजगारसुद्धा कमी होत आहेत. कारण हल्ली प्रत्येक छोट्या-मोठ्या कंपनीला स्वत:चे हार्डवेअर घेऊन आपल्या डेटा सेंटरमध्ये चालविण्यापेक्षा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जगभर सुरू केलेल्या क्लाउड डेटा सेंटर्समध्ये आपली सॉफ्टवेअर्स चालवणे सोपे आणि किफायती झाले आहे. त्यामुळे या मॉडेलमध्ये हे सर्व हार्डवेअर आणि सिस्टीम मॅनेजमेण्टचे जॉब्ज अमेझॉन, गुगल, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट अशा तगड्या क्लाउड कंपन्यांकडे शिफ्ट झाले आहेत. तिकडेही आॅटोमेशन झाल्याने अख्खे १०,००० सर्व्हर्र्सचे डेटा सेंटर फक्त ३-४ माणसे आरामात चालवू शकतात. एका डेटा सेंटरमध्ये किमान १००० ते कमाल ५००० कंपन्या आपले वर्कलोड चालवू शकतात. त्यामुळे हेच सर्व्हर जर प्रत्येक ग्राहकाने (कंपनीने) आपले स्वत: विकत घेतले असते आणि चालवले असते तर किमान १००० ते कमाल १०००० लोकांना विकेंद्रित रोजगार मिळाला असता. म्हणजे किती रोजगार नवीन तंत्रज्ञानाने खाऊन टाकले हे पाहा. हे भयावह आहे. आपल्या देशातून हजारो इंजिनिअर्स फ्रेशर्स म्हणून कंपनी जॉइन करायचे तेव्हा त्यांना अपेक्षित ट्रेनिंग द्यायला वेळ आणि पैसे लागत असल्याने, वाट पाहण्यापेक्षा, त्यांना कंपन्या अशा लो लेव्हल कामास जुंपायच्या. त्यावरही बॉडी शॉपिंग करून बक्कळ पैसे कमवायच्या. म्हणजे आपला बंडू आणि बबडी जायची अमेरिकेला ‘इंजिनिअर’ म्हणून पण करायची दिवसभर सॉफ्टवेअर टेस्टिंगचे काम, जे आता रोबो आणि आभासी बुद्धिमत्ता असलेली मशीन्स करू शकतात. मूलभूत संशोधन आणि इनोव्हेशन न झाल्याने भारतीय आयटी कंपन्या आता डायनोसॉर झाल्या आहेत. त्याहून कालबाह्य झाली आहेत ती आपली अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यांचे जुनाट अभ्यासक्र म ! आज मुलांना आयटीमध्ये डिग्री घेऊनसुद्धा आहेत त्या नोकऱ्याही मिळत नाहीत, कारण त्यांनी चार वर्षे शिकलेले ज्ञान टाकाऊ झालेले असते. जग आज रूबी /पायथन /डॉकर कंटेनर्स /नोड जेएस /मोंगो डीबी /क्लाऊडण्ट /बिग क्वेरी /अपाचे हाडुप /स्पार्क आणि एपीआय लायब्ररी इत्यादी कन्सेप्ट्स वापरून प्रोग्रामिंग करत असताना आपल्या अभ्यासक्र मात अजूनही शिकविले काय जाते? तर जावा आणि सी ++ ! मी व्यवसायाचा भाग म्हणून काही इंजिनिअरिंग महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी जातो तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलतो. तिकडे जे काही चालते आणि आज इंडस्ट्रीला काय हवे आहे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. अर्थात काही कॉलेजेसमध्ये अपवादाने एखाद्या प्राध्यापकाच्या स्वत:च्या पुढाकारातून चांगले काही नवीन कोर्सेस सुरू झालेले आहेतही; पण ९० टक्के कॉलेजं अजूनही मागे आहेत. दुसरा फटका : ग्लोबलायझेशनचा फुगा फुटला!विसाव्या शतकाच्या अखेरीस असे म्हटले जाऊ लागले की इंटरनेट, आयटी आणि आउटसोर्सिंगच्या व्यापक प्रसारामुळे जग जवळ आले आहे. यापुढे जग अधिकाधिक ‘ग्लोबल’ बाजारपेठ होईल. थॉमस फ्रीडमनसारख्या प्रख्यात लेखकाने ‘वर्ल्ड इज फ्लॅट’ सारखे बेस्टसेलर पुस्तक याच काळात लिहिले. पण आज परिस्थिती पाहता, जागतिक पातळीवर उजव्या विचारसरणीच्या राजवटी अधिकाधिक सत्तेवर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना नोकऱ्या देणे म्हणजे अशा राजवटी, ज्या स्वप्नाळू राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या आभासी डोलाऱ्यावर उभ्या असतात, त्यांना आवाहन देणे असे वाटू लागले आहे. आज जगभर विशेषत: पाश्चात्त्य राष्ट्रांत ‘बाहेरच्या’ लोकांबद्दल तिरस्कार वाढतो आहे. ‘हे भारतीय आणि चिनी आले कमी पगारावर काम करायला आणि आपल्या पोटावर पाय द्यायला’ अशी भावना वाढीस लागली आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य कष्टकरी जनतेविरु द्ध जसा विखार पसरवतात तसेच हे. त्यामुळे आपले आयटी प्रोजेक्ट्स भारतीय आयटी कंपन्यांना देऊ नये असा दबाव तिथल्या कंपन्यांवरही वाढतो आहे.परदेशी व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वर्कव्हिसाचे नियमसुद्धा कडक झाल्याने नाइलाजाने भारतीय आयटी कंपन्यांना त्या-त्या देशातील स्थानिक नागरिकांना नोकऱ्या द्याव्या लागत आहेत. त्यामुळे आपल्या भारतीय ‘फॅक्टरी’मधून बी.ई. झालेल्या ‘इंजिनिअर कामगारांना’ कॅम्पस प्लेसमेंटसुद्धा मिळणे मुश्कील झाले आहे.असे असेल, तर मग आता करायचे काय?कुठलेही क्षेत्र हे प्रवाही असते आणि त्या-त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे आकलन आणि अंगीकार करणे हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते. आंधळेपणाने पालकांनी आपल्या मुलांना सरसकट कॉम्प्युटर आणि आयटी इंजिनिअर बनवायच्या फॅक्टरीमध्ये टाकले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त ! आयटी क्षेत्र बुडालेले नाही पण त्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराचे प्रकार आणि त्याला लागणारी कौशल्ये, लागणारी माणसांची संख्या या गोष्टी बदलल्या आहेत. केवळ परदेशी जाण्याचे तिकीट म्हणून आयटीकडे पाहू नये. आज जगात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी दुसऱ्या क्र मांकाची अर्थव्यवस्था आहे. आपल्या देशाला प्रगतीमध्ये अजून खूप पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे शेती, लघु आणि मध्यम उद्योग, पायाभूत क्षेत्र, डिजिटल इंडिया अशा अनेक गोष्टींसाठी संगणकीकरण आणि आयटी सोल्युशन्सची गरज लागणारच आहे. पण पूर्वीसारखे आॅनसाइट मिळणारा ‘इझी डॉलर मनी’ आणि इकडे देशात त्याचवेळी दणक्यात मिळणारा भारतीय रुपयांमधला पगार या गोष्टी आता असणार नाहीत. थातूरमातूर खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पाट्या टाकून इंजिनिअर झालेल्या मुलांना नोकरी लागणे सोडाच, पण साधे कोणी इंटरव्ह्यूलासुद्धा बोलावणार नाही. एकोणिसाव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्र ांतीने जुने रोजगार संपवले पण नवीन रोजगारसुद्धा निर्माण केले ! फक्त ज्यांनी त्याच्याशी जुळवून घेतले ते तगले. विसाव्या शतकाच्या मध्यात सुरू झालेल्या संगणकीकरणामुळे आपले आयुष्य आमूलाग्र बदलले. परत काही जुने रोजगार संपले पण नवीन रोजगार निर्माणसुद्धा केले. आयटी सोल्युशन्समुळे कुठल्याही उद्योगाची उत्पादकता आणि गुणात्मकता वाढते. म्हणजे बँकांचे संगणकीकरण झाल्याने काही लोकांच्या नोकऱ्या नक्की कमी झाल्या पण त्याचवेळी कोअर बँकिंगच्या नेटवर्कमुळे बँकांच्या शाखासुद्धा अधिक सुरू करता आल्या. त्यामुळे त्या क्षेत्रात त्या प्रमाणात अधिक रोजगार निर्माण झाले. देशातील १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर तर वर नमूद केल्याप्रमाणे आपल्या देशातील एक अख्खी पिढी आयटी क्षेत्रात घुसली ! म्हणजे कालानुरूप रोजगार नष्ट होतात आणि नवीन क्षेत्र उदयास येते. इंजिनिअर व्हायचेच असेल तर?शेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयटी क्षेत्र तेव्हाच वाढू शकेल जेव्हा इतर उद्योग आणि व्यवसायांची वाढ होईल ! म्हणजे जास्त बँका वाढल्या तर त्याला लागणाऱ्या संगणक प्रणाली वाढतील, पायाभूत क्षेत्र वाढले तर स्मार्ट सिटीसाठी आयटी लागेलच, जास्त विमान कंपन्या सुरू झाल्या तर एअरपोर्ट आणि एअरलाइन क्षेत्रात आयटीची जास्त गरज लागेल, जास्त उत्पादन उद्योग सुरू झाले तर ईआरपी सॉफ्टवेअर्सना मागणी वाढेल, जास्त मीडिया कंपन्या सुरू झाल्या तर त्यांना लागणारे व्हीएफएक्स इत्यादी रोजगार निर्माण होतील. अशी अनेक क्षेत्रे आहेत. त्यामुळे या सर्व क्षेत्रांनासुद्धा वाढण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे ! मग तरुण मुलांना स्वत:ला किंवा पालकांना आपल्या मुलाला अथवा मुलीला इंजिनिअरिंग करायचेच असेल तर मेकॅनिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल असे मूलभूत इंजिनिअरिंग का करू नये? बँकिंग/मीडियामध्ये का त्याने करिअर करू नये? आयटीच करायचे तर चाकोरीबद्ध बीई डिग्रीच्या मागे लागण्यापेक्षा बेसिक ग्रॅज्युएशन करता करता साइड बाय साइड डेटा सायन्स / क्लाउड/ मशीन लर्निंग अशा नवीन क्षेत्रात स्पेशलाइज्ड कोर्सेस का करू नयेत? सरकारमध्येसुद्धा डिजिटल इंडिया मोहीम सुरू आहे, मग आपल्या बबडीने किंवा बबड्याने आयएएस होऊन आयटीचा विधायक वापर करून सरकारी योजनांचे संगणकीकरण करवून घेण्याचे स्वप्न का पाहू नये?नोकरीच कशाला? स्टार्टअप का नाही?नोकरीच करायला हवी असं कुणी सांगितलं? स्टार्टअपचा आॅप्शन आहेच. एवढे सगळे करिअर आॅप्शन्स उपलब्ध असताना केवळ आयटीमध्ये नोकरी करून अमेरिकेला जाण्याचं टिपिकल मराठी मध्यमवर्गीय स्वप्न आपण का पाहतोय? मुलांना काय आवडतं आणि त्यांना कशात गती आहे याचा विचार आपण कधी करणार?

 

 

- हे सगळं वाचल्यावर तीन कॅटेगरीतल्यांचं डोकं भिरभिरू शकतं.. 

1. तुम्ही यंदा इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन घेण्याच्या तयारीत आहात?१) इंजिनिअरिंगच करावं असं तुम्हाला का वाटतं?२) कुठल्या शाखेत इंजिनिअरिंग करावं असं ठरवता आहात?३) तुमच्यासमोर नेमके प्रश्न कुठले आहेत?

 

 

2. एमईही केलं? आता पुढे?१) तुम्ही कुठल्या शाखेत इंजिनिअरिंग केलं? का? हीच शाखा का निवडली?२) आता पुढे तुम्हाला काय संधी दिसत आहेत?३) जॉब लगेच मिळाला, की त्यासाठी पुन्हा काही कोर्स करावे लागले?४) बीई करूनही जॉब मिळत नाहीये, का?

 

 

3. इंजिनिअर झालात, जॉब मिळाला, आता पुढे?

१) आज काम करताना तुमच्यासमोर कोणती आव्हानं आहेत? २) कसली भीती किंवा धास्ती वाटते?३) लर्न-अनलर्न-रिलर्न हे तुम्हाला करावं लागलं/ लागेल का?४) हा अनुभव कसा होता?

 

- तुम्ही यांच्यापैकी कुणी एक असाल, तर चिन्मयचा लेख वाचून तुम्हाला प्रश्न पडू शकतात.. किंवा पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सापडू शकतात. हेच प्रश्न आणि सापडली असतील तर उत्तरं ‘आॅक्सिजन’शी शेअर करा.निवडक मतांना, अनुभवांना प्रसिद्धी. तुमच्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर लिहा आणि (मराठीत लिहिली असतील, तर पीडीएफ फॉर्मेटमध्येच) आम्हाला इमेल करा.इमेल- oxygen@lokmat.com