जिद्द ही एक कमाल गोष्ट आहे !
एखाद्या माणसाची जिद्द, जे काम करतो आहोत यावर पूर्ण विश्वास, आणि त्याबरोबर आपल्याला हवं ते गाठण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी असेल ना तर आपल्याला काहीही म्हणजे काहीही अशक्य नाहीये! चिकन सूप फॉर द सोल, किंवा ते ‘यू कॅन विन’ सारखं जरा उपदेशात्मक वाटतं ना हे वाचून. पण हा व्हिडीओ पाहा. तसा साधाच वाटतो पहिल्यांदा पाहिल्यावर. यात कझाकिस्तानमधल्या एका शाळेतली मुलं आहेत. आपल्याकडे शाळांत स्पोर्ट्स डे वगैरे असतो ना तसं तत्सम काहीतरी सुरू आहे त्यांचं. म्हणून हा व्हिडीओ कोणाच्या तरी आई-किंवा बाबानं शूट केल्यासारखा वाटतो. एक रस्सीखेचचा सामना सुरू होतो. यात दोन गट आहेत. एक लाल, तर एक हिरवा. सुरुवातीला अगदी साधा सामना सुरू होतो. दोन्ही गट सारख्या शक्तीचे वाटतात. दोन्हीही गटातली मुले अगदी जीव खाऊन दुसऱ्या गटातल्या एकेकाला बाद करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. हळूहळू यामधला हिरवा गट जरा वरचढ ठरू लागतो. तो लाल गटाचा एक-एक गाडी बाद करून अगदी जिंकणार असं वाटतं. मात्र लाल गटातला रांगेत अगदी मागे असलेला मुलगा खूप खूप ताकद लावताना दिसतो. त्याच्या प्रयत्नांना यश येईल असं काही वाटत नाही. हा सामना लाल गट हरणार असंच आपल्याला वाटतं पण हळूहळू चित्र बदलायला लागतं. या मुलाचे प्रयत्न सुरूच. नुसते सुरू नाही तर ते वाढतच आहेत. तो मागे असलेला छोटुकला मुलगा आता पुढे येतो आणि पूर्ण ताकदीनिशी जोर लावतो. जणूकाही त्याचं सारं आयुष्य या खेळातल्या जिंकण्या किंवा हरण्यावर अवलंबून आहे. हळूहळू खेळ बदलायला लागतो. हिरव्या गटाचा एकएक गडी बाद व्हायला लागतो. आणि शेवटी हा छोटुकला मुलगा त्यांच्या गटाला जिंकवतो. तो अक्षरश: सुटकेचा नि:श्वास टाकतो! तो जिंकल्यावरचा त्याचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा आहे. हा व्हिडीओ पाहताना वाटतं की आपण ना बऱ्याच वेळेला आपले विरोधक किंवा इतर कोणतीही माणसं आपल्यापेक्षा वरचढ आहेत असंच मनात घेऊन बसतो. कित्येकदा कोणतं आव्हान पेलण्याआधीच नको नको करतो! म्हणून अशा वृत्तीने आपण अनेकदा मैदानात उतरण्याआधी मनातूनच हरलेलो असतो. सांगाल मनातून हरलेला माणूस प्रत्यक्षात जिंकू शकेल का? इंटरनेट कमाल चीज आहे यार, कोण कुठली माणसं आपल्याला एका छोट्या कृतीमधून काय काय शिकवून जातात ! एका छोट्याशा गावातल्या, छोट्याशा मुलाचा हा छोटा व्हिडीओ. पण केवढं काय काय शिकवून जातो आपल्याला! यूट्यूबवर ‘कझाकबॉय, टग आॅफ वॉर’ असं शोधा किंवा हा व्हिडीओ नक्की पाहा- https://www.youtube.com/watch?v=eUAbGmtbw4M
- प्रज्ञा शिदोरे pradnya.shidore@gmail.com