अतुल कहाते
समाजमाध्यम अर्थात ‘सोशल मीडिया’ हे जग काही आपल्याला नवं नाही. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रॅम हे तर लोकप्रिय आहेतच, त्यात ट्विटर, स्नॅपचॅट, लिंकडीन हेही अनेकजण वापरतात. काहीजण निव्वळ वेळ घालवण्यासाठी तर काहीजण व्यावसायिक कारणांसाठी या समाजमाध्यमांवर असतात. आता सगळ्याच कंपन्या आपल्या जाहिरातींसाठी मोठय़ा प्रमाणात समाजमाध्यमं वापरतात. राजकारणी, नेतेही आपली मतं ट्विटरवर मांडतात. ट्विटरवरून केलेल्या तक्रारींची दखल घेतली जाण्याच्याही अनेक बातम्या आपण वाचतो. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे तर फक्त ट्विटरवरूनच संवाद साधतात. आपल्या पंतप्रधानांनीसुद्धा मुख्यत्वे ट्विटर आणि रेडिओवरचं भाषण या माध्यमांतूनच गेली साडेचार र्वष जनतेशी संपर्क साधला. एकूणच समाजमाध्यमांची ताकद सगळ्यांच्या लक्षात आलेली असल्यानं त्यांचा वापर आपल्या वैयक्तिक हितासाठी करून घेण्याकडे बहुतेक जणांचा कल दिसतो. या समाजमाध्यमांच्या रूपामध्ये कालानुरूप बदल होतीलच पण ‘समाजमाध्यम’ ही संकल्पना मात्र दीर्घकाळ टिकून राहील असं दिसतं.
हे भविष्यात महत्त्वाचं का ठरेल?
समाजमाध्यमांनी जनतेला पुरता विळखा घातला आहे. कित्येक जणांना तर याचं अक्षरशर् व्यसन लागल्याचं आपल्याला दिसतं. त्यांच्या वापराची एकदा चटक लागली की ती सुटणं फार कठीण असतं. याची जाणीव राजकारण्यांपासून कंपन्यांर्पयत सगळ्यांना झालेली असल्यामुळे अत्यंत आकर्षकपणे आपली जाहिरात ते या समाजमाध्यमांवर करतात. त्यांच्यात एकच चढाओढ सुरू असते. यासाठी खास तज्ज्ञही नेमले जातात. एकूणच छापील माध्यमापेक्षा लोक या डिजिटल माध्यमांकडे मोठय़ा प्रमाणावर वळत असल्यामुळे जाहिरातींचा ओघही डिजिटल माध्यमांकडे वळताना दिसतो. अनेक कंपन्यांनाही थेट लोकांर्पयत आपले विचार, आपल्या उत्पादनाविषयीची माहिती, नवनव्या घडामोडींचे तपशील सगळं सहज पोहोचविता येतात. पृथ्वीवरच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास एक तृतियांश लोक ही समाजमाध्यमं वापरतात. त्यातही तरुण लोकसंख्या जास्त. साहजिकच समाजमाध्यमांचा वापर इथून पुढे आणखी वेगानं वाढत जाईल. लोकांना पारंपरिक माध्यमांपासून दूर खेचून आपल्याकडे ओढण्यासाठी जे शक्य आहे तेही समाजमाध्यमं करत राहातील. स्वाभाविकपणे समाजमाध्यमांची पकड आपल्या हाती ठेवण्यासाठी जो तो धडपडणार हे निश्चित!
हे शिकण्यासाठी कोणती कौशल्यं लागतात?
समाजमाध्यमं वापरता येणंच इथं पुरेसं नाही तर समाजमाध्यमांचं अंतरंग समजून घेण्याची जाण विकसित करणं यासाठी महत्त्वाचं ठरतं. समाजमाध्यमांवरची एखादी ‘पोस्ट’ का ‘व्हायरल’ होते आणि इतर असंख्य पोस्ट्सकडे लोक ढुंकूनसुद्धा का बघत नाहीत, हा प्रश्न आपण स्वतर्ला विचारला पाहिजे. त्याच्या उत्तरातून आपल्याला समाजमाध्यमांशी संबंधित असलेली कौशल्यं आत्मसात करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल याचं उत्तर मिळू शकेल. यासाठी समाजमाध्यमं चतुराईनं वापरणार्या लोकांच्या वापराकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. अगदी साधी गोष्टसुद्धा ते ज्या पद्धतीनं समाजमाध्यमांवर प्रसारित करतात त्यामध्ये याचं रहस्य दडलेलं असतं. लोकांना आकर्षून घेणारी भाषा, विनोद किंवा चारोळ्या यांचा सुयोग्य वापर, उचित संदर्भ देणं अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो. मोठय़ा नेत्यांकडे तर यासाठी लोकांचा अक्षरशर् फौजफाटाच असतो. हे लोक त्या नेत्याची प्रतिमा उजळवण्यासाठी समाजमाध्यमांचा अत्यंत चतुराईनं वापर करताना दिसतात. समाजमाध्यमांवर झळकत असलेला मजकूर ज्या वेगानं ‘व्हायरल’ होतो त्याच वेगानं लोक तो विसरूनही जातात याचं भान या क्षेत्रात शिरू पाहणार्यानं ठेवणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे लोकांना आता सातत्यानं नवं काहीतरी हवं असतं. एखादी मोठी बातमीसुद्धा काही मिनिटांमध्ये शिळी होऊन जाण्याचा हा काळ आहे. म्हणजेच अशा वेगाला जो साथ देऊ शकेल तोच इथे टिकेल. विलक्षण वेगानं आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींविषयी विचार करून अत्यंत संक्षेपानं त्याविषयी चटकदार भाष्य करण्याची क्षमता जोपासणार्या लोकांची या क्षेत्रात अगदी चलती आहे आणि इथून पुढेही ती असणार आहे.
रोजगाराच्या संधी कोणत्या?
1. समाजमाध्यमांची ताकद ओळखून त्यांचा सुयोग्य वापर करू शकणार्या लोकांची गरज खूप मोठय़ा प्रमाणावर सगळीकडे जाणवते. कमी शब्दांमध्ये आणि चित्रं/व्हिडीओ यांचा वापर करून लोकांच्या मनावर आपल्याला हव्या असलेल्या प्रतिमा ठसवण्याचं कसब साधू शकणारे लोक यात उतरू शकतात. 2. त्यासाठी फार तांत्रिक ज्ञान मिळवण्याची गरज नसते. काही प्रमाणात जाहिरातींच्या क्षेत्रासारखं हे क्षेत्र आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यांना याच्या पुढे जाऊन या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे त्यांना ‘सोशल मीडिया मार्केटिंग’शी संबंधित असलेले अभ्यासक्र म करता येतील. 3. उदाहरणार्थ आपलं उत्पादन फेसबुकवर अधिक ठळकपणे कसं झळकवायचं यासाठी फेसबुक काही गोष्टी उपलब्ध करून देतं. त्यामधले बारकावे शिकून घेतले की समाजमाध्यमं आणखी प्रभावीपणे वापरण्याच्या युक्त्या समजतात. असे अभ्यासक्रम खासगी संस्था चालवतात. ऑनलाइन माध्यमातूनही असे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. या प्रकारची कौशल्यं आता सगळ्याच प्रकारच्या कंपन्यांना लागत असल्यामुळे त्यातून रोजगाराच्या संधी मिळू शकतात.