सौ. प्रेमला अरविंद यादव
(तळेगाव दाभाडे) -
निसर्ग एक जादूगार आहे. त्याच रूपडं कॅमे:यात बंद करून ठेवता येतं. पण निसर्गाला बंद करून ठेवता येत नाही. त्याच्याशी दोस्ती केली तर तो आपल्याला जगवेल. आपण त्याला उद्ध्वस्त केलं तर आपलाच घात होईल हा संस्कार लहान वयातच मुलांवर व्हायला हवा. नुसते पर्यावरणाचे पुस्तकी धडे देऊन गिरवून काही उपयोग नाही.
निसर्गाशी दोस्ती, सहज वावर हे सारं आपोआप घडायला हवं. आपल्या जगण्याचा भाग व्हायला हवं.
माझी पैसाफंड प्राथमिक शाळा तळेगाव दाभाडेसारख्या निसर्गरम्य ठिकाणी आहे. शाळेच्या भोवती झाडी आहे. समोर आणि मागे गवत आणि शेती आहे. जवळच सुंदर जुने तळे आहे. परिसर रमणीयच आहे. हाच परिसर आमच्या शाळेचा, कॉलेजचा कॅम्पस आहे. परिसरात आमची छोटीशी प्राथमिक शाळा आहे. पहिली ते चौथीर्पयतचे जेमतेम नऊ-दहा वर्षाचे विद्यार्थी इथं शिकतात.
आमच्या वर्गाच्या अगदी पाय:यांवर, परिसरात कधीकधी साप निघतात.
त्यामुळे विद्यार्थी घाबरतात. कधी कधी आम्हाला सर्वानाच खूप भीती वाटते. धामण, घोणस, मण्यार, नाग सर्व प्रकारच्या सापांचा
या परिसरात वावर आहे.
आमची शाळा फार जुनी म्हणजे शंभर वर्षापूर्वीपासून या जागेवर उभी आहे. विद्यार्थी विचारतात, ‘ बाई सारखे साप का येतात इथे?’ आम्ही सांगतो. ‘अरे, खरंतर हे त्यांचंच घर आहे. त्यांच्या जागेवर आपण अतिक्रमण केलं आहे’ पण या सापांना आपण मारलं तर अनर्थच होईल.’
जास्त काही सांगण्यापेक्षा आम्ही सर्पमित्रंना बोलावून साप पकडतो आणि पुन्हा व्यवस्थित डोंगरात नेऊन सोडतो. त्यांना जगू देणं आपलं कर्तव्य आहे. हे मुलांना हळहळू पटतं.
विद्याथ्र्याच्या मनातील भीती घालवून आम्ही त्यांना धाडसी बनवलं आहे. सापांची नावे आता सर्वजण न घाबरता सांगतात. एवढेच नाही तर पहिलीतले छोटे विद्यार्थी सुद्धा साप पाहिल्यावर न घाबरता बाईंना सांगतात, ‘बाई पायरीजवळ साप होता. इथं बिळात गेला, मी पाहिला!’
मला वाटतं हीच आमची निसर्गमाया, हीच दोस्ती.