शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

एसटी वर्कशॉपमधली ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 10:11 IST

एसटी वर्कशॉपमध्ये दुरुस्तीचं काम मोठं अंगमेहनतीचं. मोठमोठाले जॅक चढवणं, चाक खोलणं, टायर उतरवणं अशी सारी कष्टाची कामं. कुठंही जा, सहसा पुरुषच ही काम करतात. पण, इथं चित्र वेगळंच दिसलं. बसच्या दुरुस्तीचं काम एक महिला सहज सफाईनं करत होती. ती कोण?

- साहेबराव नरसाळे

वर्षाचे सासरे ब्रह्मदेव गाढवे, त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. ते म्हणाले, ‘सरकार ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबवतंय. मी ‘सून वाचवा, सून शिकवा’ हे अभियान राबवतोय़ महिला अबला कधीच नसतात़ त्यांच्याही मनगटात ताकद असते; पण फक्त त्यांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन द्यायला हवं. घरात बसवून त्यांना अबला करण्यापेक्षा रोजगार मिळण्यासाठी उपाययोजना राबवा. आर्थिक सक्षम करा, तरच ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानाला महत्त्व आहे़’

एसटी महामंडळाचं अहमदनगर शहरातील तारकपूर आगार. खडखडट करत एक एसटी बस आगारात शिरली. बसच्या दरवाजाजवळच ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानाचं पोस्टर चिकटलेलं दिसलंच. बसमधून कॉलेजात जाणारे मुल-मुली उतरले. झॅकपॅक कपडे. पाठीवर सॅक. कॉलेजला जाणारे बरेचसे मुलं-मुली. बस पूर्ण रिकामी झाली आणि ड्रायव्हरनं निघायचं म्हणून गिअर टाकला, तर दांड्याचा खडखड असा मोठा आवाज होतो. काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात आलं म्हणून त्यानं गाडी हळूहळू एसटी वर्कशॉपमध्ये नेली.तसं पाहिलं तर एसटी वर्कशॉपमध्ये दुरुस्तीचं काम करणारे पुरुषच. कामही मोठं अंगमेहनतीचं. मोठमोठाले जॅक चढवणं, चाक खोलणं, टायर उतरवणं अशी सारी कष्टाची कामं. कुठंही जा, सहसा पुरुषच ही काम करतात; पण इथं चित्र वेगळंच दिसलं. बसच्या दुरुस्तीचं काम एक महिला सहज सफाईनं करू लागली. रपारप जॅक चढवू लागली. चाक खोलू लागली. टायर उतरवू लागली. हातावर ग्रीस घेऊन सर्व्हिसिंंग करू लागली. लोक काम पाहत होते, पण ती तिच्या कामात व्यग्रच होती. गाडी रिपेअर झाली. निघाली. मात्र हे भन्नाट काम करणाऱ्या या हिंमतवाल्या महिलेला भेटायचं म्हणून मी पुन्हा दुस-या दिवशी तारकपूर आगार गाठलं. काय बोलायचं, का बोलायचं वगैरे सांगितल्यावर मग तिनं आपली गोष्ट सांगितली.

वर्षा गाढवे तिचं नाव. वर्षा ही पूर्णा (जि. परभणी) येथील सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी. आई-वडिलांनी मजुरी करून तिला शिकवलं. बारावी सायन्सला ८५ टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झालेली. नोकरीचा शॉर्टकट म्हणजे डी.एड., असा तिच्यासकट सर्वांचा समज. म्हणून डी.एड.ला गेली. प्रथमश्रेणीत डी.एड. उत्तीर्णही झाली. २०११ सालची ही गोष्ट. आता दिवस फिरणार, सरकारी नोकरी लागणार अशी आशा असताना त्याच काळात शिक्षक भरतीवर निर्बंध आले. दरम्यान लग्न झालं. औरंगाबादच्या संतोष गाढवे यांच्याशी वर्षाचा विवाह झाला. २०१२ साली लग्न होऊन वर्षा औरंगाबाद शहरातील मुकुंदनगरला आली. पती संतोष हे औरंगाबाद येथील सैन्य भरती कार्यालयात नोकरी करतात. वर्षाच्या घरात एक लहानगी लेकही बागडायला लागली. सुखवस्तू गृहिणीसारखं तिला सहज जगता आलं असतं. मात्र शिकण्याची ऊर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती़ पती संतोष आणि सासरे ब्रह्मदेव दोघंही पुरोगामी विचारांचे़ ‘चूल आणि मूल’ या संकुचित वृत्तीत महिलांनी अडकूच नये हे त्यांचंही मत. त्यांनी वर्षाला प्रोत्साहन दिलं. दोन महिन्यांची लेक घरी ठेवून वर्षा एका खासगी शाळेवर जुलै २०१४ मध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाली. शाळा सुटल्यानंतर टायपिंंग, संगणक प्रशिक्षक असे कोर्स तिनं पूर्ण केले.

एका वर्षात तीनं जॉब सोडला आणि आयटीआयला प्रवेश घेत इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल्सचे धडे गिरवू लागली. काहीतरी पार्टटाइम काम करण्याची तिची इच्छा होती़ वर्षाचे सासरे ब्रह्मदेव हे रिक्षाचालक. त्यांनी वर्षाला रिक्षा शिकवली. औरंगाबादच्या रस्त्यांवरून ते वर्षाला रिक्षा शिकवू लागले़ वर्षाचा रिक्षाचालकाचा परवानाही त्यांनी काढला. काही काळ शिक्षिका असलेली ती आता रिक्षाचालक झाली. औरंगाबादच्या रस्त्यांवरून वर्षाची रिक्षा धावू लागली. लोक उभं राहून राहून तिच्याकडे कुतूहलाने पाहायचे. रोज सकाळी-संध्याकाळी वर्षाची रिक्षा औरंगाबादच्या रस्त्यांवरून धावायची.

२०१६ साली तिचा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलचा डिप्लोमा पूर्ण झाला़ दरम्यानच्या काळात मुक्त विद्यापीठातून वर्षाने बी.ए.ची पदवीही मिळविली होती़ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर एका कंपनीत तिने वर्षभर अ‍ॅप्रेण्टीसशिप केली. मग तिनं इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला होता. पहिलं सत्र पूर्ण झाले. त्याचवेळी तिला एसटी महामंडळाचा कॉल आला. चार वर्षांची मुलगी आणि थोडं सामानसुमान घेऊन ती अहमदनगरच्या तारकपूर आगारात १ डिसेंबर २०१७ रोजी दाखल झाली़ वर्षाचे शिक्षण इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलचे आणि तिला काम मिळाले मोटार मेकॅनिकलचं. ते कामही ती मोठ्या खुशीने करतेय़ इथं कामाला सुरुवात होऊन चारच महिने झालेत. दिवसभर लालपरी सुस्थितीत ठेवण्याचं काम आणि रात्री इंजिनिअरिंगचा अभ्यास असं तिचं रुटीन सुरू झालं आहे.वर्षा शिक्षणाची तळमळ सांगत होती आणि माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा तीच बस उभी राहिलीए जिच्या दरवाजावर ‘लेक शिकवा, लेक वाचवा’ सांगणारं पोस्टर होतं. शिक्षण आणि धमक या दोन गोष्टी जगण्याची कशी उमेद पेरतात, त्या जिद्दीचं एक रूपच समोर दिसत होतं.(‘लोकमत’च्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहे. sahebraonarasale@gmail.com)

टॅग्स :Womenमहिला