शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दिवाळीनंतर सुस्तावलेलं रुटीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 09:34 IST

दिवाळीनंतरच्या आठवड्यात आपण पुन्हा रुटीनला भिडतो. पुढचे चार-पाच दिवस मोबाइलमधले कुटुंबाचे दिवाळीचे फोटो पाहतो, शुभेच्छांच्या फॉरवर्ड इमेजेस डिलीट करत बसतो.. पण मन?ते दिवाळीतच असतं.. हाताला फटाक्यांचा वास उरतो, जिभेवर लाडवाची, चकलीची चव असते तशा आठवणीही..त्या पुन्हा पुढच्या दिवाळीची वाट पाहू लागतात..

- ओंकार करंबेळकर

‘अरे शिमग्याला नाही, पालखीला नाही, गणपतीला नाही आता किमान दिवाळीला तरी मला म्हातारीला तोंडं दाखवा रे!’- अशी कडक भाषेत पोस्टकार्ड लिहिणारी, नातवंडांसाठी आंब्या-फणसाची साटं करून ठेवणारी, एरवी स्वत: तूपभात लोणच्या पलीकडे अधिकचे दोन घास न खाणारी; पण नातू किंवा मुलगा घरी येणार म्हणून कंबर कसणारी अशी आजी/काकू/मावशी नाहीतर आई असतेच प्रत्येकाच्या आयुष्यात.आणि दिवाळीत ती वाट पाहते लेकरांची.दिवाळी चार दिवसांची ती येते, जाते.आपण पुन्हा आपल्या व्यापाला लागतो. आॅफिसात जुंपले जातो. कॉलेज, हॉस्टेलमध्ये मित्रांमध्ये रमतो.पण त्या चार दिवसांची दिवाळी थोडी सोबत येते..आणि पहिल्या आठवड्यात आपल्याही नकळत आपल्या डोळ्यांना ओल येते. आठवणी पायात पायात करतात.आताशा बिझी असल्याचा पट्टा वर्षभर दुसरं काही करूच देत नाही. बदलत्या वेगवान काळात आपल्यामध्ये, घरांमध्ये, नात्यांमध्ये, कुटुंबांमध्ये मोठे बदल झाले आहेत. जिममध्ये ट्रेडमिल नावाचा सतत पळणारा पट्टा असतो, त्याच्या वेगाने तुम्हाला चालावं किंवा पळावं लागतं. जरा लक्ष ढळलं किंवा तुमचा चालण्याचा जोर कमी झाला, तर अडखळायला होतं किंवा तुम्ही खाली पडता तरी. आपण सगळेच आता नोकरी किंवा शिक्षण नावाच्या वेगवान ट्रेडमिलवर स्वत:ला उभं केलं आहे. सतत आपलं शेड्युल टाइट. त्यादरम्यान फोनमधल्या विशलिस्टमध्ये अनेक गोष्टी घालत आपण हे सारं दिवाळीत करू म्हणतो. उत्सवापेक्षा बारा महिन्यांचा शीण घालवण्याचा हक्काचा काळ असं स्वरूप आता दिवाळीला आलंय. वर्षभर ठरवलेल्या मित्र, नातेवाइकांच्या भेटी याच काळात होतात. सणाच्या उत्साहाबरोबर आरामामुळे एक प्रकारचे सुस्तावलेपणही येत असतं. लहानपणच्या दिवाळीच्या आठवणी येऊ लागतात. भावंडांशी केलेली भांडणं, किल्ले डोळ्यांसमोर यायला लागतात. यावर्षी दिवाळीपर्यंत साथीला असलेल्या पावसामुळे एखादी जुनी पावसाळी दिवाळी आठवते. त्यावर्षी मऊ पडलेले फटाके किंवा चिवड्याचे चामट झालेले पोहे, पाऊस बघत खिडकीत बसून लोण्यात बुडवून खाल्लेल्या चकल्याही आठवतात.आणि दिवाळी संपून गेली तरी दिवाळीचा असा हॅँगओव्हर मनावर राहतोच. फराळाच्या डब्यातलं फराळ, ते तळाला जातं; पण खाली उरतंच काहीतरी...तसं मनात बरंच काही उरतंच.होस्टेलवर किंवा आॅफिसात अनेकजण घरचा फराळ आणतात. मग तो मिक्स करून पुन्हा एकदा फराळावर यथेच्छ आडवा हात मारला जातो. उरलेल्या चिवड्याची मिसळही करून होते. डब्याच्या खाली तुपामुळे एकमेकाला चिकटून एकच गोळा झालेले लाडू किंवा तळाशी असलेल्या खारट चिवड्याचा मसाला जिभेवर दाबायची इच्छा बळावायला लागते. दिवाळी अंक वाचताना मध्येच भावंडांमध्ये रंगलेला पत्त्यांचा डाव आठवतो. पाच-तीन-दोन पासून सुरुवात होत सगळे डाव खेळून होतात. चिडाचिडी करून होते. ती आठवून आता हसू येतं. दिवाळी अशी हळूहळू हलकेच सुस्तावत आपल्यासोबत चालते. पत्ते खेळताना, गप्पा मारताना जुन्या आठवणी- गमती आठवतात. मग त्यावर खोखो हसणं आठवतं. हे वरवर साधे हलकेफुलके प्रसंग असले तरी आपल्यासाठी ते चार्जिंग पॉइंट्स असतात. पुढच्या दिवाळीपर्यंत हे क्षण चार्जिंग पुरवतात.

सण, आनंद, समाधान कदाचित हेच असावं. फटाके, नवे कपडे, वस्तू यांच्यापेक्षा हे एकत्र येणं, जमणं, गप्पा, दंगामस्ती, खळखळून हसणं, सर्वांनी पुन्हा सैलावून मोकळं-ढाकळं होणं हाच दिवाळीचा हेतू असावा. हे सगळं होणं म्हणजेच दिवाळी सुफळ झाली असं म्हणावं लागेल.आणि मग आपण दिवाळीनंतरच्या आठवड्यात कामाला भिडतो. पुढचे चार-पाच दिवस मोबाइलमधले दिवाळीचे फोटो पाहतो, शुभेच्छांच्या फॉरवर्ड इमेजेस डिलीट करत बसतो..

आणि दिवाळीत हाताला फटाक्यांचा वास उरतो.किंवा जिभेवर लाडवाची, चकलीची चव असते.तशा दिवाळीच्या आठवणीही कामात मध्येच येतात, जातात..आता काही दिवसात त्या आठवणी पुसट होतील..पण दिवाळीनं दिलेला ब्रेक. चार्ज होत कामाला लागण्याचं बळ, घरच्यांसोबतच्या निवांत गप्पा आणि त्यातलं मन:पूत हसू हे सारं मात्र आपल्यासोबतच असतं..पुढच्या दिवाळीपर्यंत..पुन्हा भेटण्यासाठी! onkark2@gmail.com 

टॅग्स :diwaliदिवाळी