पाऊस सारखा पडत होता. सगळीकडं पाणीच पाणी. घरात पण पाणी शिरायला लागलं मी तर खूपच घाबरले. पहिल्यांदा असं स्वत:च्या घरात पाणी शिरताना बघितलं. पाणी वाढतच होतं. माझे पती मला सारखे समजावीत होते. पण मी हवालदिल त्यात तेवढय़ात काही लोक आमच्यात घरात शिरलेलं पाणी पहायला गर्दी करू लागले. मी खूप चिडले. पाणी कसं भरलं हे काय पहायचं असं वाटून तिडिकच गेली डोक्यात. पण गप्प बसले.
पाऊस कमी झाला. मी शांतपणे बसले होते आणि मग वाटलं आज माझ्यावर ही स्थिती आली तर मी किती घाबरले. पण आजवर पुराचे लोंढे पाहताना मला कधीच काही का वाटलं नाही? कुठं जवळपास पूर आला समजलं की चाललो आम्ही पूर पहायला, पुरापासून संरक्षण म्हणून झाडावर बसलेलं कुणी दिसलं की हसायचो फिदीफिदी. आणि आज माझ्यावर वेळ आली तर संताप?
आता मी ठरवलंय की, असा भयाण पाऊस, पूर दिसला की मी देवाला हात जोडून प्रार्थना करीन, म्हणेन देवा फार परीक्षा पाहू नकोस माणसांची!
- कालिंदी, भंडारा