एनएसके यूथ फाउंडेशन मंडळ, नाशिक
‘त्यांना’ रेग्युलर, चारचौघांसारखा गणेशोत्सव साजरा करायचाच नव्हता. ढोल-ताशे, धांगडधिंग्याला फाटा देऊन ‘हटके’, समाजोपयोगी काही करावं, असं त्यांना वाटत होतं. अखेर तरुणांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाची शिबिरे घेण्याची कल्पना सुचली अन् तिची अंमलबजावणीही सुरू झाली.. नाशिकमधल्या एनएसके यूथ फाउंडेशन मंडळाचा हा उपक्रम.. नाशिकमध्ये क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिरे, वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती वगैरे सामाजिक कामे करणार्या एनएसके यूथ फाउंडेशनच्या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे अवघे दुसरे वर्ष आहे. हे मंडळ उत्सवात आठ दिवस युवक, महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाची शिबिरं आयोजित करतं.
नाशिकमधल्या महात्मा गांधी रोडवर ‘एनएसके यूथ’चे ‘मायबोली’ वाचनालय आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. नीलेश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी गणेशोत्सव मंडळाला प्रारंभ केला. पहिल्या वर्षी मायबोली वाचनालयाच्या सभागृहातच आठ दिवस निरनिराळ्या विषयांवर व्याख्याने झाली. यंदाच्या वर्षी याच परिसरातले महात्मा गांधी रोड व्यापारी संघटनेचे गणेश मंडळदेखील चंद्रशेखर शाह यांच्या पुढाकाराने ‘एनएसके यूथ’ला येऊन मिळाले आहे. यंदा व्यक्तिमत्त्व विकास, व्यवस्थापन, कौटुंबिक समुपदेशन असे याविषयावर ते व्याख्यानं आयोजित करणार आहेत.
मंडळाच्या उपक्रमाविषयी अँड. नीलेश कुलकर्णी सांगतात की, ‘आम्ही देखाव्यांवर खर्च करीत नाही. विसर्जनासाठी शाडू मातीच्या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. सकाळी आरती करतो, सायंकाळी देशभक्तिपर, प्रबोधनपर गीते, पोवाडे लावले जातात, तेही कमी आवाजात! अनंत चतुर्दशीला मिरवणूक काढत नाही. ‘क्रेडाई’चे माजी अध्यक्ष किरण चव्हाण यांनी भेट दिलेली एक हजार रोपेदेखील आम्ही लोकांसाठी मंडळात ठेवणार आहोत. ज्याची इच्छा असेल त्याने रोप नेऊन ते लावावे, असा यामागचा हेतू आहे. देशभक्ती व्यक्त करण्यासाठी हातात तलवारी, बंदुका हाती घेण्याचा काळ केव्हाच गेला. आता तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींतून देशाला पुढे नेऊ शकता. आम्ही असेच काहीतरी करतोय!’
- सुदीप गुजराथी